spot_img

राजकारणातून सामाजिकता जोपासणारे प्रा.डॉ.हेमंत देशमुख

राजकारणातून सामाजिकता जोपासणारे प्रा.डॉ.हेमंत देशमुख

●मयुर चौधरी●
अमरावती
7798060500

आयुष्याचे प्रश्न सोडविताना जीवन सुखकर करण्यासाठी चांगले जिवन जगण्याकरिता चौकटीबाहेर पडून, ,पण एक स्वत: करिता आचार-संहिता तयार करून संयमीतपणे कसे जगावे तर हे आपल्याला प्रा. हेमंत मु. देशमुख सर यांच्या कडून शिकावे लागेल., शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील दांडगा अनुभव असणारे सर जेव्हा मार्गदर्शन करतात, तेव्हा आत्मविश्वास जागृत होऊन जिद्द वाढते. सर म्हणतात, संकटांना सामोरे जा, त्यांना पाठ दाखवू नका. मनमिळावू, शांत, संयमी व्यक्तिमत्व असलेले हेमंत देशमुख सर कुणाशीही पटकन जुळवून घेतात. विशेषतः युवकांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रधर्म सांगून त्यांचे रुपांतर चांगल्या व्यक्तिमत्वामध्ये कसे होईल याकरिता ते पोटतिडकेने त्यांच्याशी नेहमी सुसंवाद साधतात.
प्रा. हेमंत देशमुख हे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीच्या संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. तसेच विदर्भातील ख्यातनाम संस्था असलेल्या विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी,अमरावती मध्ये कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अमरावती, तसेच दैनिक जनमाध्यम वृत्तपत्राचे ते कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशन जळगांवचे उपाध्यक्ष , व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कॉम्पुटर टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आणि विदर्भातील प्रख्यात शिक्षण संस्था, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या संगणक समितीवर विषयतज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहलेले आहे.
या व्यतिरिक्त त्यांनी नागपूर शहर व जिल्हा क्रिक्रेट असोसिएशनचे सचिव, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर, कोल्हापूरचे सहसचिव, अमरावती जिल्हा तलवारबाजी असोसिएशन, अमरावती जिल्हा कॉर्फबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. याखेरीज त्यांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात नोकरी करताना राष्ट्रीय सेवा योजना, विज्ञानमंच, क्रीडा, विद्यार्थी संघ व इतर कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून काम पाहिले.ते नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण व क्रीडामंडळाचे कार्यकारी सदस्य होते. नागपूर व अमरावती विद्यापीठाच्या क्रिकेट निवड समितीचे एकाच वेळी अनुक्रमे अध्यक्ष व सदस्य म्हणून काम पाहणारे एकमेव व्यक्ती आहेत. याशिवाय अमरावती विद्यापीठ बॉल बॅडमिंटन निवड समितीचे सुद्धा ते सदस्य होते. तसेच अमरावती विद्यापीठाच्या प्राध्यापक निवड समिती, महाविद्यालय संलग्नीकरण समिती, बोर्ड ऑफ स्टडीज समिती यावर सुद्धा त्यांनी काम बघितले आहे.
त्यांचे शालेय शिक्षण वनिता समाज, मणीबाई गुजराती हायस्कूल, अमरावती,कौ.दो.हायस्कुल पुसद, तसेच ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय व शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे झाले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण हे शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूर व पदार्थ विज्ञान विभाग नागपूर विद्यापीठ तसेच संगणकशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण कोल्हापूर इत्यादी ठिकाणी झाले. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत ते क्रिकेट, खो-खो, बास्केट बॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल व जिम्नॅस्टिकचे उत्कृष्ट खेळाडू होते. कॉलेज जिवनात ते श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूर येथे छात्रसंघाचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील स्व. डॉ. एम. आर. देशमुख हे प्राचार्य व नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव होते. तसेच डी. के. शिंदे स्कुल ऑफ सोशल वर्क, कोल्हापूरचे आणि अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. ते समाजशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. इंदोरचे सुप्रसिद्ध संत श्री. भय्युजीमहाराज यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हेमंत देशमुख सरांच्या जीवनाला बरीच कलाटणी मिळाली. श्री सद्गुरु दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्ट इंदोरच्या माध्यमातून सरांचा सामाजिक कार्याकडे अधिक ओढा वाढला आणि आपल्या गुरूकडून प्रेरणा घेऊन ते राष्ट्रधर्म व राष्ट्रप्रेम याच्या प्रचाराला लागले. विद्यार्थ्यांना राष्ट्रधर्म, राष्ट्रचेतना म्हणजे काय याबाबत ते नेहमी मार्गदर्शन करीत असतात.
ते म्हणतात माणूस हा मृत्युलाच घाबरत असतो, म्हणून मुठभर दादांची गुंडगिरी आपण खपवून घेतो. पण जन्माला यायची आणि मृत्यूची वेळ ही ठरलेली असते. मग कोणाला घाबरायचे कशाला ?

विद्यार्थ्यांना अभ्यास सांभाळून चांगली लोकशाही टिकविण्याचे ते नेहमी आवाहन करतात. ते म्हणतात, चांगले लोक राजकारणात येत नाही म्हणून वाईट लोकांच्या हाती सत्ता येते.. म्हणून चांगल्या लोकांनी हिंमतीने या क्षेत्रात यायला हवे. वडिलांचा संघर्ष, आईचे संस्कार, आजोबांचे आध्यात्म, संत श्री. भय्युजी महाराजांचे मार्गदर्शन तसेच शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा यातून साकार झालेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. हेमंत देशमुख सर, शब्द आणि भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा श्रोता वर्ग समोर असला तरी ते त्या अनुषंगाने उत्कृष्ट बोलतात आणि अनेक सभा-
संमेलनातून श्रोत्यांची मने जिंकतात. सर्वच क्षेत्रांचा व्यासंग असल्यामुळे त्यांना ते सहज जमते. वयाच्या 63 व्या
वर्षात पदार्पण केलेले सर, अजूनही तरूणांना लाजवेल अशा पद्धतीने १० ते १२ तास काम करत अनेक प्रश्न हाताळतात.
आपल्याला पाहिजे त्या मार्गाने जाता आले तर होणारा आनंद अवर्णनीय असतो. पण काही कारणास्तव जर मार्ग बदलावा लागला तर त्याची खंत न बाळगता, आपल्या हातून चांगले काम होणार आहे असे गृहीत धरून हाती घेतलेल्या कामात स्वतःला झोकून द्यावे. त्याकरिता अंगी संयम व सकारात्मकता असावी असे त्यांना वाटते. इच्छाशक्तीच्या जोरावर कुठलेही कार्य पुढे नेण्यास ते सक्षम आहेत. एक आदर्श मुलगा,एक प्रेमळ पती, मित्रत्व जपणारा मित्र, कुटुंबाविषयी, समाजाविषयी,आदर्श राष्ट्राविषयी विशेष आस्था असणारे, विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाविषयी जाणून घेऊन त्यांना तणावमुक्त करणाऱ्या देशमुख सरांचे बालपणापासून एक आवडते गाणे आहे, जे त्यांच्या मनावर कोरल्या गेले आहे. ते म्हणजे.. जिंकू किंवा मरू…”माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू…

राजकारणातून सामाजिकता जोपासणाऱ्या आदरणीय हेमंत देशमुख सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!