spot_img

मराठीचे वय 2500 वर्षेः जगातली 10 व्या क्रमांकाची भाषा 50 बोली; जाणून घ्या आपल्या आईची थोरवी,मराठी भाषा गौरव दिनी!

मराठीचे वय 2500 वर्षेः जगातली 10 व्या क्रमांकाची भाषा
50 बोली; जाणून घ्या आपल्या आईची थोरवी,मराठी भाषा गौरव दिनी!

●मिररवृत्त●
●मनोज कुलकर्णी/छत्रपती संभाजीनगर●

आपल्या माय मराठीचे वय साधरणतः अडीच हजार वर्षांचे. मराठी पुस्तकांची बाजारपेठ तब्बल 250 कोटींची. मराठी जगातली 10 व्या क्रमांकाची भाषा. तर भारतातली 25 टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात सापडतात.आज 27 फेब्रुवारी. या दिवशी महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जाणून घेऊ माझ्या ज्ञानोबा-तुकोबांच्या शब्दाने समृद्ध झालेल्या माय मराठीची थोरवी.

◆27 फेब्रुवारीच का?◆

मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन्ही भिन्न आहेत. मराठी भाषा ज्ञानभाषा करण्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान दिले. कुसुमाग्रज यांनी कविता, कादंबरी, नाटक, एकांकिका अशा सर्व प्रकारात लिखाण केले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्येही कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलाय.

◆1 मे राजभाषा दिन◆

मराठी राजभाषा दिवस 1 मे रोजी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. परंतु राज्य कारभाराची अधिकृत भाषा मराठी नव्हती. त्यामुळे वसंतराव नाईक सरकारने ‘मराठी राजभाषा अधिनियम 1964’ सर्वप्रथम आणून 11 जानेवारी 1965
रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची
अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे 1 मे रोजी
अधिकृतपणे जाहीर केले. 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.

◆880 भाषा बोलल्या जातात◆

भारतात सध्या तब्बल 880 भाषा बोलल्या जातात. त्यात गेल्या 50 वर्षांमध्ये 220 भाषा लुप्त झाल्या. सध्याही 10 लाखांपेक्षा अधिक लोक बोलतात अशा भाषांची संख्या 29 आहे. भारताची राजभाषा हिंदी आहे. राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात मराठी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्ल्याळम्, मणिपुरी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दूचा समावेश आहे.

◆2220 वर्षांपूर्वीचा शिलालेख◆

मराठी भाषेचे वय सुमारे 2500 वर्षे असल्याचे पुरावे सापडलेत. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्मी लिपीतला असून, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरजवळच्या नाणेघातला आहे. यात ‘महारठिनो’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. शिलालेखाच्या तिसऱ्या ओळीतला मजकूर दिसत नाही. मात्र, त्यात ‘महारठिनो’ हा शब्द ठळक दिसतो. डॉ. वा. वि. मिराशी यांनी ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात हा शिलालेख प्रसिद्ध केला आहे. हा ग्रंथ 1954 झाली आला. त्यातल्या 10 व्या पृष्ठावर ‘…य महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस… य महतो मह…’ अशा शिलालेखावरील ओळी आहेत. त्याचा अर्थ ‘महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीरश्रेष्ठ… महान अशा पुरुषात श्रेष्ठ अशा…’ असा देण्यात आला आहे. या शिलालेखावरील महारठी प्रदेशाचा उल्लेख म्हणजेच महाराष्ट्र प्रदेश. जेव्हा हा शिलालेख लिहिला गेला, त्यापूर्वी 300 वर्षे तरी ही भाषा अस्तित्वात असली पाहिजे. त्यावरून मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असावे, असे सांगितले जाते.

◆11 कोटी भाषक◆

तब्बल 11 कोटी लोक मराठी लिहितात, बोलतात. ही जगातली साधारणतः दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्र हा शब्द इसवी सणाच्या चौथ्या शतकात वापरल्याचे म्हणतात, तर या शब्दाचा पहिला वापर पाचव्या शतकातल्या ‘महावंश’मध्ये सापडतो. आपल्या देशात लोकसंख्येच्या दृष्टीने मराठीचा विचार केला, तर तिचे स्थान हिंदी, बंगाली, तेलुगूनंतर येते. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खान्देशी, मराठवाडी अशा 50 च्या घरात बोली आहेत. मराठीचा उगम संस्कृत-प्राकृतमधून झाल्याचे मानतात. ती देवनागरी लिपीत लिहिली जाते, तर व्याकरण संस्कृतावर आधारित आहे. सातवाहन, राष्ट्रकूट आणि अनेक मराठी राज्यकर्त्यांनी भारतभर राज्य केले. थेट अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशापर्यंत विजयी पताका फडकावली. जगातील 72 देशांमध्ये मराठी भाषक आहेत.

◆2 हजार पुस्तके प्रसिद्ध◆

मराठी भाषेमध्ये दरवर्षी सुमारे दोन हजार पुस्तके आणि पाचशे दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लाखो लोक उपस्थित असतात. साहित्य संमेलन, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पुस्तक विक्री होते. धार्मिक ग्रंथ, पाककृती, व्यक्तिमत्व विकास, ललित, वैचारिक ग्रंथांची मराठीतली बाजारपेठ सुमारे 250 कोटींची असून, देशातल्या ग्रंथालयांपैकी 25 टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.

◆4 ज्ञानपीठ विजेते◆

मराठीचे आद्यलिखित दहाव्या शतकातले आहे. इ. स. 983 मध्ये कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वर मूर्तीच्या पायथ्याशी कोरलेला मजकूर ‘श्री चामुण्डराजे करवियले’ सापडतो. तोच आद्यलिखित मानतात. मराठीचे आद्यग्रंथ म्हणून ‘ज्योतिषमाला’ (अकरावे शतक), कवी मुकुंदराज लिखित ‘विवेकसिंधु’ (इ.स. 1188), म्हाइंभट लिखित ‘लीळाचरित्र’ (इ.स. 1278) या ग्रंथाकडे पाहिले जाते. मराठीला आतापर्यंत चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत. 1974 मध्ये वि. स. खांडेकर, 1987 मध्ये कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर, 2003 मध्ये विंदा करंदीकर आणि 2014 मध्ये भालचंद्र नेमाडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

◆5 अभिजात भाषा◆

देशात सध्या पाच भाषांना केंद्र सरकारने अभिजाततेचा दर्जा दिला आहे. त्यात तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळमचा समावेश आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून 10 जानेवारी 2012 रोजी अभिजात मराठी भाषा समिती स्थापन झाली. या समितीने जानेवारी 2013 मध्ये शासनाला अंतिम अहवाल दिला. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी 4 मुद्दे महत्त्वाचे असतात. त्यात 1) भाषेची प्राचीनता 2) भाषेची मौलिकता आणि सलगता 3) भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण 4) प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले असलेले नाते, या गुणांचा समावेश होते. मराठी या कसोटीवर पूर्ण उतरते. तिला आता हा दर्जा कधी मिळणार, याची उत्सुकता आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!