spot_img

पेपरफुटी प्रकरणातील मध्यस्थी असलेल्या दोन दलालास अटक , अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

पेपरफुटी प्रकरणातील मध्यस्थी असलेल्या दोन दलालास अटक

◆अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

येथील बहुचर्चित मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता चांगलीच गती मिळाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कथित दोन दलालास सुध्दा अटक केली असून आता या गुन्ह्यात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड तसेच गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने मंगळवारी ही संयुक्त कार्यवाही करण्यात आली.किशोर भारत डोंगरे विजयनगर गोपाल नगर अमरावती,राहुल धनराज लिंगोट देवी पार्क अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
२१ फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रीमलँड येथे एआरएन असोसिएट या परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा घेण्यात आली होती. पेपर सुरू झाल्यानंतर यश कावरे या उमदेवाराला हॉॅल तिकीटावर प्रश्नांची उत्तरे लिहून आणून नक्कल करतांना पकडण्यात आले. परिक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने आणि राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने राज्यात हे प्रकरण तापल्यानंतर सीपी रेड्डींनी या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखेकडे दिला. गुन्हेशाखेचे अधिकारी नांदगावपेठ पोलिसांच्या मदतीने हा तपास करित असताना त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पेपर फुट प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर किशोर भारत डोंगरे ,राहुल धनराज लिंगोट यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकारणातील मुख्य आरोपी पर्यंत पोलीस पोहचण्यास अद्याप अयशस्वी झाले असले तरी लवकरच मुख्य आरोपी जेरबंद करू व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ अशी भूमिका पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड यांनी घेतली आहे. दरम्यान या प्रकरणात अटक असलेल्या आरोपींची संख्या चार झाली असून नांदगाव पेठ पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!