spot_img

राज्यातील 48 मतदार संघात कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या खास रिपोर्ट

राज्यातील 48 मतदार संघात कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या खास रिपोर्ट

लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीने यंदा लढली गेली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र आता मतदानानंतर मतमोजणीची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे. या मतमोजणीत नेमकं काय चित्र स्पष्ट होणार याचा अंदाज बांधणं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून अवघड असलं तरी, मतदारांमध्ये असलेली भावना जाणून घेत प्राथमिक अंदाज निश्चितच बांधता येणं शक्य आहे. त्यामुळं राज्यातील 48 मतदार संघामध्ये कोण निवडून येण्याची शक्यता आहे. याचं काही अंदाज आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत.

मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची सर्व टप्पे पार पडले आहेत. राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. यावेळेस त्यापेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा दावा एनडीएनं केला होता. मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि मतदारांनी व्यक्त केलेला असंतोष उद्धव ठाकरे यांच्या बाबत मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती या सर्व पार्श्वभूमीवर ही गणित निश्चितच बदलली जातील अशी चर्चा आहे. प्रत्येक मतदारसंघ निहाय तेथील राजकीय आणि जातीय समीकरण पाहता कौल कुणाच्या बाजूनं लागेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. हा मतमोजणी पूर्वीचा सर्वे किंवा ओपिनियन पोल नाही. तर मतदार संघातल्या परिस्थितीवरून बांधलेले काही ठोकताळे आहेत. जाणून घेऊया राज्यातील प्रत्येक मतदारसंघ निहाय काय होती परिस्थिती..?

◆विदर्भ◆

विदर्भ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये महायुतीने या विभागावर आपली पकड मजबूत केली. मात्र यंदा ही पकड सैल झाल्याचं पाहायला मिळाली.

●नागपूर : नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड मानला जातो. त्यामुळं हा मतदारसंघ भाजपासाठी अतिशय सुकर मानला जातो. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विद्यमान खासदार आहेत. नितीन गडकरी हे सहज निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी त्यांना तगडे आव्हान उभं केलं. त्यामुळं नितीन गडकरी यांनी प्रचारामध्ये सातत्यानं सहभाग घेत अगदी स्थानिक स्तरावर प्रचार करावा लागला. या मतदारसंघात टक्कर जरी जोरदार असली तरी नितीन गडकरी यांच्या विजयाची शक्यता अधिक मानली जात आहे.

●रामटेक : रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदार संघ आहे. या मतदारसंघातून देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव दोन वेळा निवडून आले होते. या मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र शिवसेना पक्षाचे कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला. शिवसेनेच्या विभाजनानंतर आता हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांनी लढवला आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसची श्याम कुमार बर्वे हे रिंगणात आहेत. जात प्रमाणपत्रामुळं रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. त्यामुळं या मतदारसंघात राजू पारवे वरचढ ठरतील अशी शक्यता आहे.

●वर्धा : हा मतदारसंघ भाजपाकडं असून रामदास तडस हे इथले विद्यमान खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमर काळे यांनी त्यांना यावेळी जोरदार आव्हान दिलं आहे. या मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाचं असलेलं प्राबल्य पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे. रामदास तडस यांनी दोन वेळा खासदारकी भोगल्यानंतर ही मतदारसंघाचा विकास केला नाही असा आरोप होत आहे तर दुसरीकडं काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत अशी ओळख असलेले अमर काळे यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी लागली, मात्र, रामदास तडस यांचा असलेला जनसंपर्क आणि त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली प्रतिमा त्यांना यावेळी काठावरचं बहुमत मिळवून देण्याची शक्यता आहे.

●चंद्रपूर : चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर हे 2019 मध्ये निवडून आले होते. त्यापूर्वी हा मतदार संघ भाजपाचे हंसराज अहिर यांच्याकडं होता. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या ठिकाणी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात लढत झाली. लढायला इच्छुक नसलेल्या मुनगंटीवार यांनी लढतीत रंगत आणली, मात्र त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळं ते पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले पाहायला मिळाले. या मतदारसंघात वडट्टीवार आणि धानोरकर यांच्यात जरी संघर्ष पाहायला मिळाला तरी सुद्धा धानोरकर यांना मिळालेली सहानुभूती आणि कुणबी समाजाची मते त्यांना विजयापर्यंत घेऊन जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

●भंडारा-गोंदिया लोकसभा : मतदारसंघात संभाव्य विजयी उमेदवार सुनील मेंढे (भाजपा) काँग्रेसकडून डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली तर भारतीय जनता पक्षाचे खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली. या ठिकाणी अटीतटीची चुरस आहे. मात्र भाजपाचे पारडे जड असल्याची शक्यता आहे. 2019 मध्ये मोदींच्या लाटेत अडीच लाखांचे मताधिक्य होते. मात्र हे मताधिक्य आता केवळ 10 ते 15 हजार असण्याची शक्यता आहे.

●गडचिरोली : गडचिरोली लोकसभा संभाव्य विजयी उमेदवार नामदेव किरसान भाजपाने दोनदा निवडून आलेले अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी दिली तर काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली. सलग दोनदा निवडून आल्यानंतर त्यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी दिसली तर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा भक्कम प्रचार केल्यानं काँग्रेसचे पारडे जड दिसून येत आहे. आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यानं संविधानसंदर्भात जो प्रचार करण्यात आला त्यामुळं त्यांनी भाजपाविरोधी मतदान केलं असं दिसून येतय.

●अमरावती : सर्वांचे लक्ष लागलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी, भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे समर्थक मात्र नवनीत राणा याच विजयी होतील असा आत्मविश्वास बाळगून आहेत. मात्र, या मतदारसंघात अल्पसंख्याक आणि दलित समाजाची मते निर्णायक ठरणार असून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी रंगत आणली आहे. तरीही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा दिलेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे याचे पारडे जड मानले जात आहे.

●बुलढाणा : यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. गत अनेक वर्षांपासून प्रतापराव जाधव यांची मतदारसंघावर पकड आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडकर यांच्यासोबत त्यांची लढत आहे. खेडकर यांचा मतदारसघात संपर्क असला तरी जातीय समीकरणे आणि विकासाची कामे पाहता जाधव निवडून येण्याची शक्यता आहे.

●अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिहेरी लढत झालीय. वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांचा पारंपरिक मतदारसंघ असला तरी यावेळी त्यांच्या साम्राज्याला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. एकीकडं काँग्रेसच्या काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असं बोललं जात असलं तरी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या झालेल्या मत विभाजनाचा भाजपलाच फायदा होईल आणि अकोल्यात देखील भाजपचा झेंडा फडकेल. त्यामुळं भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांना संधी असल्याचं मानलं जातय.

●यवतमाळ : वाशिम-यवतमाळ मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीला हमखास यश मिळणार असं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाने यावेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. राजश्री पाटील यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री संजय देशमुख यांनी आव्हान उभं केलं असून ते विजयी होतील अशी शक्यता आहे. या मतदारसंघात महायुतीकडून नवा चेहरा मतदारसंघात उतरविण्यात आल्यामुळं शिवसेना शिंदे गटामध्ये आधीच नाराजीचा सूर उमटत होता. याचं पडसाद या निवडणुकीत उमटले असल्याचा अंदाज आहे.

◆उत्तर महाराष्ट्र◆

●नंदुरबार : नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ देशातील सर्वात पहिला मतदार संघ आहे. या मतदारसंघावर गेली अनेक वर्ष काँग्रेसच वर्चस्व राहिलं आहे. मात्र गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपाच्या हिना गावित या मतदारसंघात विजयी झाल्या आहेत. पुन्हा एकदा हिना गावित या रिंगणात उतरल्या असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी यांनी आव्हान उभे केलं आहे. मात्र दोन वेळा खासदार राहिलेल्या हिना गावित आणि त्यांचे वडील विजयकुमार गावित यांचा या आदिवासी बहुल मतदारसंघावर असलेला प्रभाव पाहता पुन्हा एकदा हिना गावित या विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

●धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपाचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात मुस्लिमांची मते नेहमीच निर्णायक ठरत आली आहेत. मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये ही मते विभागली जात असल्यानं त्याचा फायदा भाजपला होत होता. भाजपानं पुन्हा एकदा सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्छाव रिंगणात आहेत. यावेळी मुस्लिमांची मते एक घंटा महाविकास आघाडीकडे राहण्याची शक्यता असल्यानं बच्छाव यांच्या निवडून येण्याबाबत अधिक शक्यता असल्याचं म्हटलं जातय.

●जळगाव : जळगाव मतदार संघानं नेहमीच भाजपाला साथ दिली आहे. त्यामुळं भाजपासाठी हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने करण पवार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं लढत चुरशीची झालीय. या मतदारसंघात मराठा समाज बहुल मतदार तसेच ओबीसी मतदार असल्यानं जय या मतदारांच्या मतदानावर अवलंबून आहे. भाजपाचे उन्मेश पाटील स्वतः निवडणूक लढत नसले तरी खरी लढत ही उन्मेश पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातच असून या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. या लढतीत स्मिता वाघ या अत्यंत कमी मताने विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

●रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघ हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघातून त्यांच्या सून रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. त्यांना भाजपाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार केलाय. त्यामुळं या मतदारसंघात पुन्हा एकदा रक्षा खडसे या विजयी होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी जोरदार लढत दिली. मात्र नवा चेहरा असल्यानं त्यांना यश येण्याची शक्यता कमी आहे.

●दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघात विद्यमान मंत्री भारतीय पवार या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा पवार यांच्यावर विश्वास टाकला आहे. मात्र या मतदारसंघातील जनतेमध्ये पवार यांच्या बद्दल विशेष नाराजी आहे. त्यामुळं महाविकास आघाडीने पहिल्यांदाच रिंगणात उतरवलेल्या भास्करराव भगरे या उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यामुळं या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येण्याची शक्यता अधिक आहे.

●नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटांनी रिंगणात उतरवले आहे. मात्र या मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं मतांचं विभाजन होऊन राजाभाऊ वाजे यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघात हेमंत गोडसे यांनी उशिरा सुरू केलेला प्रचार हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असून वाजे यांना विजय मिळण्याची शक्यता अधिक आहे.

●पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना भाजपाने तिकीट नाकारले आणि महायुतीने डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली. बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे रिंगणात असल्यामुळं या मतदार संघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. बविआ आणि शिवसेना यांच्या मतांची विभागणी झाली तर ती भाजपाच्या पथ्यावर पडणारा असून डॉक्टर हेमंत सावरा यांना विजयाची संधी अधिक आहे.

●भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार आणि मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा एकदा भाजपानं संधी दिली आहे. तर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून या मतदारसंघात चुरस निर्माण केलीय. त्यामुळं या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार असून बाळयामामा म्हात्रे यांना अधिक संधी असल्याचं बोललं जातय.

●कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलीय. महायुतीचे उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र वैशाली दरेकर हा नवखा चेहरा असल्यानं आणि श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी महायुतीने संपूर्ण ताकद पणाला लावल्यानं पुन्हा एकदा या मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी होतील अशी शक्यता आहे.

●ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून नरेश मस्के यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली पकड आणि राजन विचारे यांनी केलेली कामे या बळावर पुन्हा एकदा जनता राजन विचारे यांनाच पसंती देईल असं चित्र आहे.
पश्चिम महाराष्ट्र

●कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विजय नक्की मानला जात आहे. शाहू महाराजांच्या सामना शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याशी होता. इथे झालेले मोठ्या प्रमाणात मतदान हे शाहू महाराजांच्या विजयाची खात्री देतात. सतेज पाटील यांनी या मतदार संघातील पूर्ण मॅनेजमेंट आपल्या हातात घेतल्यानं याचा मोठा फायदा शाहू महाराजांना होणार आहे. त्याचबरोबर संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांच्या खानदानाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा फटका हा मंडलिकांना बसणार आहे.

●हातकणंगले : हातकणंगले मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात उबाठा गटाचे सत्यजित पाटील सरूडकर हे रिंगणात होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी त्याचबरोबर डी सी पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा या मतदारसंघांमध्ये भेटण्याची शक्यता आहे. परंतु या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं लढाईचे चित्र निर्माण झाल्यानं उबाठा गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांना मतदारांची सहानुभूती मोठ्या प्रमाणात भेटण्याची शक्यता असल्यानं ते पहिल्या क्रमांकावर राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असून इथे राजू शेट्टी हे दुसऱ्या क्रमांकावर राहतील. तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावं लागणार आहे. चार उमेदवार रिंगणात असल्याकारणानं येथे राजू शेट्टी यांना मत विभागणीचा फटका बसणार आहे.

●सांगली : सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खडा जंगी दिसून आली. उबाठा गटाने येथे डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं सांगलीमध्ये काँग्रेस नाराज झाली. सांगलीच्या जागेवर शेवटपर्यंत काँग्रेस दावा करत राहिली. येथे भाजपाने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली. संजय काका पाटील हे हॅट्रिक करण्याची तयारीत आहेत. तर विशाल पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. येथे संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील हा सामना मोठ्या प्रमाणात करणार असून सहानुभूतीची लाट ही विशाल पाटील यांच्या बाजूने असणार आहे. परंतु इथे तिरंगी लढत होत असल्यानं त्याचा फायदा मत विभागणीमध्ये होऊन संजय काका पाटील हे फार कमी मताने विजयी होण्याची शक्यता आहे.

●सातारा : साताऱ्यामध्ये भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली आहे. इथे भाजपाने उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यास फार उशीर झाला. त्याचा फटका उदयनराजे यांना बसू शकतो. परंतु या मतदारसंघात २०१९ रोजी झालेला पराभव पाहता राष्ट्रवादीकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपाने इथे पूर्ण शक्ती पणाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा येथे प्रचारासाठी मैदानात उतरले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं शरद पवार यांना असलेली सहानुभूती आणि शशिकांत शिंदे यांचे कार्य, शरद पवारांची भावनिक साद यामुळे या ठिकाणाहून शशिकांत शिंदे यांचा विजय नक्की मानला जात आहे.

●माढा : माढा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांचे सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी झाला आहे. येथे विजयसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर व रामराजे निंबाळकर यांची साथ असल्याकारणाने धैर्यशील मोहिते पाटील यांचे पारडं जड मानले जात आहे. रंजीत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मतदारसंघावर विशेष लक्ष देऊन होते. परंतु एकंदरीत मतदान पाहता धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने येथे निवडून येतील असं चित्र आहे. तर रणजीत नाईक निंबाळकर यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

●बारामती : महाराष्ट्रातील ठेचाल मतदार संघ किती सर्वात महत्त्वाची लढत ही बारामती मतदारसंघांमध्ये झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा सामना त्यांच्या भावजय अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्याशी झाला. येथून विजय शिवतरे आणि हर्षवर्धन पाटील यांनी बंड थोपटले होते. या बंडोबांना शांत करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी साम-दाम-दंड-भेद ही सर्व अस्त्र वापरली. ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजय अशी होतीच. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची म्हणजे ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी आहे. शरद पवार यांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली. अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे या अत्यंत कमी मतांनी निवडून येतील अशी अपेक्षा आहे.

●शिरूर : शिरूर मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची लढत अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात झालेली ही थेट लढत असल्यानं दोन्ही बाजूनी प्रचारामध्ये रंगत दिसली. अजित पवार यांनी प्रचारात अमोल कोल्हे यांच्यावर अनेक आरोप केले. परंतु या सर्व आरोपांना थेट उत्तर देत अमोल कोल्हे यांनी मतदारसंघांमध्ये केलेली काम, शरद पवार यांची भावनिक साद याकरता अमोल कोल्हे हे या मतदारसंघातून एक लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा अंदाज आहे.

●पुणे : पुणे मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली. या मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ही लढत सुरुवातीला एकतर्फी वाटत होती. परंतु रवींद्र धंगेकर यांनी या लढतीमध्ये जीव ओतला. या मतदारसंघांमध्ये वसंत मोरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील. भाजपाने मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पूर्ण शक्ति पणाला लावली. अत्यंत चुरशीच्या अशा या लढतीत येथे रवींद्र धंगेकर यांचा विजय नक्की मानला जात आहे. त्यांचे मताधिक्य जास्त नसेल परंतु विजय पक्का आहे.

●सोलापूर : सोलापूर मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रणिती शिंदे तर भाजपाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत झाली. बाहेरचा उमेदवार या कारणाने राम सातपुते यांच्यावर अनेक टीका झाली. धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयोगाला येथील जनता कंटाळली असून येथील अनेक विकास कामं वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची बदललेली भूमिका याचा फटका राम सातपुते यांना बसणार आहे. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार, राहुल गांधी थेट मैदानात उतरल्याने त्याचा मोठा फायदा प्रणिती शिंदे यांना होणार असून प्रणिती शिंदे यांचा विजय पक्का मानला जात आहे.

●अहमदनगर : अहमदनगर मतदारसंघांमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्याशी झाली. लंकेने या लढाईचे स्वरूप धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीचं केलं. सामान्य माणसांचा लंके यांना असलेला पाठिंबा. कोविड काळात लंके यांनी केलेलं सामाजिक कार्य आणि शरद पवारांची भावनिक साद या कारणामुळं सुजय विखे पाटील यांनी कितीही मोठी ताकद लावली प्रचारामध्ये भाजपाचे नंबर एक नेते उतरवले तरीही निलेश लंके फार कमी मताधक्क्यांनी विजय होतील अशी अपेक्षा आहे.

●मावळ : मावळ मतदार संघामध्ये एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा सामना शिवसेना उबाठा गटाचे संजोग वाघेरे यांच्याशी झाला. या मतदारसंघांमध्ये अतिशय चुरशीची लढत बघायला भेटत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने निवडणुकीत कुठलही सहकार्य केलं नसल्याचा आरोप श्रीरंग बारणे यांनी केला आहे. या मतदारसंघांमध्ये श्रीरंग बारणे यांच्या विषयी फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी आहे. त्याचबरोबर संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीने ही लढत अतिशय चुरशीची झाली असली तरी उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीच्या जोरावर संजोग वाघेरे यांचा निसटता विजय येथे होईल अशी अपेक्षा आहे.

●शिर्डी : शिर्डी मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा सामना उबाठा गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी झाला आहे. सदाशिव लोखंडे यांच्या बाबत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांची मोठी नाराजगी आहे. त्याचबरोबर स्थानिक भाजपा नेत्यांनी प्रचारादरम्यान दाखवलेली उदासीनता याचा फटका सदाशिव लोखंडे यांना बसू शकतो. या जागेवर भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय नक्की मानला जात आहे.

●उत्तर मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघांमध्ये यंदा भाजपाने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडं गेल्यानं काँग्रेसनं अंतिम क्षणी भूषण पाटील यांना पियुष गोयल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी मुंबई उत्तर हा मतदारसंघ आतापर्यंत भाजपासाठी सर्वात सुरक्षित असा मतदारसंघ मानला जातो. भाजपाच्या उमेदवाराच येथील लीड हे चार लाखापेक्षा जास्त असतं. यंदा पियुष गोयल यांना उमेदवारी दिल्यानं बाहेरचा उमेदवार मतदार संघात लादला गेला अशा पद्धतीचा जोरकस प्रचार महाविकास आघाडीकडून केला गेला. पियुष गोयल यांची उमेदवारी सर्वात अगोदर जाहीर झाल्यानं त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात जोर पकडला होता. तर भूषण पाटील यांनी त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीही पियुष गोयल यांचा पारड जड आहे. ५० टक्के पेक्षा जास्त मतं पियूष गोयल या मतदारसंघात घेतील. त्यांचा विजय अगदी सोपा मानला जात आहे.

●मुंबई उत्तर मध्य : मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या उज्वल निकम यांच्याशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरल्या. एकंदरीत येथे झालेला प्रचार आणि उज्वल निकम यांच्यावर लावण्यात आलेले आरोप या कारणानं या सर्व बाबींचा फायदा वर्षा गायकवाड यांना होऊ शकतो. तसेच या मतदारसंघात मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात असल्याकारणानं ही मत सुद्धा वर्षा गायकवाड यांच्या पारड्यात पडतील. उज्वल निकम यांच्या प्रचारासाठी भाजपानं पूर्ण शक्ती पणाला लावली असली तरी वर्षा गायकवाड या निसटत्या मताधिक्यानं या मतदारसंघातून विजयी होतील.

●मुंबई उत्तर पूर्व : मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) मतदारसंघात भाजपानं येथेही विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत विद्यमान आमदार मिहीर कोटेचा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे नेते संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. ही लढत थेट मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील अशी रंगली. या मतदारसंघात गुजराती-मराठी वाद त्याचप्रमाणं निवडणुकीदरम्यान झालेले पैसे वाटप याचा फटका मिहीर कोटेचा यांना बसू शकतो. मिहीर कोटेचा यांच्यासाठी या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो सुद्धा घेतला. परंतु आदल्याच दिवशी घाटकोपर मध्ये होर्डिंग पडून १४ जणांचा मृत्यू झाल्या कारणानं पंतप्रधान यांच्या रोड शो वर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या सर्व बाबींचा फायदा संजय दिना पाटील यांना होणार असून संजय दिना पाटील हे कमी मताधिक्यानं का होईना विजयी होतील अशी अपेक्षा आहे.

●मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) : मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी या दोघांनीही उमेदवाराची घोषणा फार उशिरा केली. उबाठा गटाकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर गजानन कीर्तीकर यांनी मुलाविरोधात निवडणूक लढण्यास नकार दिल्यानं अखेरच्या क्षणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर या दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप लागले असून त्यांची ईडी चौकशी सुरू आहे. या मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांच्या प्रचारात जरी सहभाग घेतला असला तरी सुद्धा मनापासून ते प्रचारात सहभागी झाले नव्हते. निवडणुकीनंतर गजानन कीर्तिकर यांनी ज्या पद्धतीचे आरोप केले आहेत ते पाहता या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांचा विजय नक्की मानला जात आहे. एक लाख पेक्षा जास्त मताधिक्यानं अमोल कीर्तीकर यांचा विजय या मतदारसंघातून अपेक्षित आहे.

●मुंबई दक्षिण मध्य : मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाचे नेते, अनिल देसाई हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या मतदारसंघातून काँग्रेस निवडणूक लढवण्यास इच्छुक होती. परंतु मुंबई उत्तर मध्य मधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानं महाविकास आघाडीतील निर्माण झालेला पेच शांत झाला. राहुल शेवाळे यांनी या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली. भाजपानेही राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी बरेच प्रयत्न केले. अनिल देसाई यांच्या तुलनेत राहुल शेवाळे यांच पारड येथे जड मानले जात आहे. अनिल देसाई यांनाच असलेला पक्षांतर्गत विरोध त्यातच उमेदवार निवडीवरून झालेली धुसफूस याचा फटका अनिल देसाई यांना बसणार असून राहुल शेवाळे हे या मतदारसंघातून हॅट्रिक साधतील.

●मुंबई दक्षिण : मुंबई दक्षिण या मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर कुठला उमेदवार द्यावा याबाबत महायुतीने बराच वेळ वाया घालवला. अखेरकार शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना अरविंद सावंत यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या मतदारसंघातून भाजपाचे मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या दोघांनीही निवडणुकीसाठी तयारी केली होती. परंतु ही जागा शिंदे गटाकडं गेल्यानं भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचंड हिरामोड झाला. प्रचारात भाजपा कार्यकर्त्यांनी यामिनी जाधव यांना कितपत मदत केली?हा सुद्धा प्रश्न आहे. ही लढत शिवसेनेच्या दोन गटात होत असल्यानं त्याच प्रकारे मागील दहा वर्षात अरविंद सावंत यांनी केलेली विकास कामे, ठाकरे यांच्यासोबत असणारी सहानुभूतीची लाट यामुळं सावंत याचा विजय निश्चित मानला जातोय
मराठवाडा

●बीड : बीडमध्ये भाजपाचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली आहे. इथे 2019 मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे या निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांना डावलून त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळं भाजपाला यावेळी शिंदे गट अजित पवार गट यांची साथ मिळाली आहे. पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे हेही त्यांच्यासोबत प्रचारात यावेळी दिसले. बीडमध्ये जातीय राजकारणाला खूप महत्त्व आहे. इथे धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. पंकजा मुंडे या ओबीसी असल्यामुळं ओबीसी समाजातील त्यांना अधिक मत मिळतील असं राजकीय तज्ञ्जांनी म्हटलंय. या अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा ह्या कमी मतांनी विजयी होतील असं बोललं जातंय.

●छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (शिंदे गटाचे) संदिपान भुमरे विरुद्ध शिवसेना (ठाकरे गटाचे) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात थेट लढत आहे. इथे महायुतीकडून उमेदवार निश्चित होत नव्हता. त्यामुळं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस अगोदर येथे उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर या जागेवर एमआयएमचे इम्तियाज जलील हे निवडून आले होते. मागील पाच वर्षात त्यांच्याकडून समाधानकारक कामं झाली नसल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. पक्षीय बलबल आणि मतांचे समीकरण पाहता, यावेळी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचे पारडे जड दिसत आहे. या मतदारसंघात मुस्लिम बहुल समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं यांच्या मतांचा फॅक्टर उमेदवाराच्या विजयाला किंवा पराभवाला कलाटणी ठरू शकतो. असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलंय. परंतु याचा सारासार विचार केला तरी शिवसेना (ठाकरे गटाचे) चंद्रकांत खैरे हे विजय होण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जातंय.

●जालना : जालनामध्ये भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध महाविकास आघाडीचे कल्याण काळे विरुद्ध वंचितचे प्रभाकर वखले यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व दिसून आले आहे. कारण 1999 पासून 2019 पर्यंत रावसाहेब दानवे हेच इथे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. दानवे यांनी केंद्रीय मंत्री असताना त्यांनी अनेक कामं मतदारसंघात केली आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री यामुळं तळागाळातील लोकांशी त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. प्रभावी वक्तृत्व आणि यामुळं दानवेंचा कार्यकर्त्याशी थेट संपर्क आहे. जरी जालन्यांमध्ये मराठा आरक्षण नेते म्हणून जरांगे-पाटील यांना वातावरण अनुकूल असले आणि भाजपाला प्रतिकूल असले तरी दानवेंच्या मतांवर काही परिणाम होऊ शकणार नाही, असं बोललं जातंय. इथे रावसाहेब दानवे यांचा विजय निश्चित मानला जातोय.

●धारशिव : धाराशिवमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यात थेट लढत झाली आहे. 2019 मध्ये येथे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे जिंकून आले होते. आता शिवसेनेत फूट पडल्यामुळं येथे कुणाचा खासदार निवडून येतो याची उत्सुकता आहे. येथे महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सभा झाली आहे. या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गटाचे) वर्चस्व असल्याचं दिसून येतय. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळं मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले आहे. याचा फटका ओमराजे निंबाळकर यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु मतांचे समीकरण पाहता अगदी काही मतांनी ओमराजे निंबाळकर हे विजयी होतील, असं बोललं जात आहे.

●लातूर : लातूरमध्ये भाजपाचे सुधाकर शृंगारे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे नरसिंह उदगीरकर यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. लातूरमध्ये मागील दोन वेळा म्हणजे 2014 ते 2019 मध्ये भाजपाचा खासदार निवडून आला आहे. 2019 मध्ये सुधाकर शृंगारे हे निवडून आले होते. परंतु आता इथे वंचितनेही शिरकाव केल्यामुळं मोठ्या प्रमाणात मतांचे वर्गीकरण झाले आहे. याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही बसण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. परंतु स्थानिकांचा कौल आणि राजकीय विश्लेषकाचा कौल पाहता भाजपाचे सुधाकर शृंगारे हे विजय होतील असं बोललं जातय.

●हिंगोली : हिंगोली मतदारसंघ हा अनेक कारणामुळं चर्चेचा मतदारसंघ राहिला आहे. कारण इथे शिवसेना (शिंदे गटाकडून) हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर ही उमेदवार बदलण्यात आला आहे. इथे शिवसेना (शिंदे गट) बाबुराव कदम विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) नागेश पाटील-आष्टीकर विरुद्ध वंचितचे डॉ. बी. डी. चव्हाण यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. इथे प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा झाली आहे. त्यामुळे येथे कोण विजय होणार याची उत्सुकता लागली आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे शिवसेना (शिंदे गटाचे) हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला स्थानिकांनी विरोध केला होता. कारण लोकांपर्यंत पोहोचण्यास… आणि लोकांचे समस्या सोडविण्यात ते अपयशी ठरल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या उमेदवारीला भाजपाने ही विरोध केला होता. भाजपाने उमेदवार बदलण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाग पाडलं होतं. बाबुराव कदम (शिंदे गट) आणि नागेश पाटील-आष्टीकर (ठाकरे गट) यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे आणि दोघांनाही जिंकण्याची संधी आहे मात्र येथे नागेश पाटील-आष्टीकर हे काही अल्पमतात जिंकून येऊ शकतात. अंस राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

●नांदेड : नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव पाटील-चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्यात थेट लढत झाली आहे. 2019 मध्ये येथे भाजपाचे प्रतापराव पाटील-चिखलीकर हे निवडून आले होते. मात्र नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो आणि खासकरून येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे चांगले वर्चस्व आहे. परंतु आता अशोकराव चव्हाण हे भाजपामध्ये गेल्यामुळं येथे भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील-चिखलीकर हे विजय होतील असं भाकीत केलं जात आहे.

●परभणी : परभणीत महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्या थेट लढत झाली आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातोय. 2019 मध्ये शिवसेनेचे संजय जाधव हे खासदार झाले होते. परंतु आता शिवसेनेत फूट पडल्यामुळं आणि मतांचे विभाजन झाल्यामुळं महादेव जानकर आणि संजय जाधव यांना विजयाची टक्केवारी फिफ्टी-फिफ्टी मानली जाते.

●शिर्डी : शिर्डी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गटाचे) भाऊसाहेब वाघचौरे विरुद्ध शिवसेना (शिंदे गटाचे) सदाशिव लोखंडे यांच्यात थेट लढत झाली आहे. इथे 2019 मध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार म्हणून निवडून आले होते. येथे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभा घेतली होती. तर उद्धव ठाकरेंची या ठिकाणी सभा झाली होती. येथे सदाशिव लोखंडे यांचे पारडे जड मानले जाते. भाऊसाहेब वाकचौरे हे 2009 ते 2014 पर्यंत खासदार होते. मात्र आता शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळं मतांचे मोठ्या प्रमाणात वर्गीकरण झाले आहे. पण याचा फटका नक्की कोणाला बसणार हे चार जूनलाच कळेल.

●अहमदनगर : अहमदनगर येथे भाजपाचे सुजय विखे-पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून (शरद पवार गटाचे) निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली आहे. इथे 2009 पासून भाजपाचा खासदार आहे. म्हणजे मागील पंधरा वर्षात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. 2019 मध्ये सुजय विखे-पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते. या जिल्ह्यात निलेश लंकेंनी आमदार म्हणून मोठ्या प्रमाणात चांगली अनेक कामं केली आहेत. मुख्यतः कोरोनाकाळात त्यांनी रुग्णांची प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन सेवा केली होती. त्यांची काळजी घेतली होती. तसेच निलेश लंके यांचा तळागाळातील जनसंपर्क आणि साधी राहणी आणि लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्याकडं मोठा कल, यामुळं निलेश लंके यांना लोकांचा पाठिंबा आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळं शरद पवार यांना मोठी सहानुभूती आहे. याचा फायदा निलेश लंके यांच्या विजयाला कारणीभूत ठरू शकतो. असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलंय. तर सुजय विखे-पाटील यांचे स्थानिक पातळीवर काम करण्यास स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेला नकार याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.

(साभार-ई टीव्ही भारत)

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!