spot_img

प्रत्येकाच्या अंगात कर्तृत्व असते, संधी शोधली की ते झेपावते

प्रत्येकाच्या अंगात कर्तृत्व असते, संधी शोधली की ते झेपावते:स्त्री शक्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधान

प्रत्येकाच्या अंगात कर्तृत्व असते, संधी शोधली की ते झेपावते, त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे. दरम्यान त्या गुणांचा गौरव करण्याचा राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनने केलेला प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
येथील राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीने शनिवारी राज्यातील पाच कर्तृत्ववान महिलांना अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
घोंगडी, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आ. प्रवीण पोटे, महिला आयोगाच्या सदस्या इंदू शिंदे, जि. प. च्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, उद्योजिका स्नेहल लोंढे, बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर, प्रगतीशील महिला शेतकरी ज्योती देशमुख यांना राज्यपाल रमेश बैस व पवार यांच्या हस्ते ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पवार यांनी पुढे बोलताना प्रत्येकीच्या यशाची गाथा सांगितली.ते म्हणाले, अनेक वर्षांपासून अशा महिलांना पुरस्कार देऊन गौरवल्यामुळे समाजातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळते.महिलांच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असल्याचे सांगून पवार म्हणाले, शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योजना राबवत असते. त्याचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी करत असतात. सर्वांच्या सहभागातून आपण यापुढेही काम करत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमात सन्मानार्थी पाचही महिलांच्या संघर्षाची व कार्यकर्तृत्वाची चित्रफीत दाखवण्यात आली. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, गायिका वैशाली माडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. माजी खासदार डॉ. विकास महात्मे व संतोष महात्मे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन पूजा राठोड यांनी केले. कार्यक्रमादरम्यान वैशाली माडे यांना गीत गायनाचाही आग्रह झाला. त्यामुळे आपल्या अल्पशा संबोधनाचा शेवट त्यांनी ‘राम अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में. दया करो प्रभू, देखो इनको हर घर के आँगन मे. राधा मोहन शरणम्.. सत्यम शिवम सुंदरम्’ तत्पूर्वी गृहभूमी असलेल्या अमरावतीच्या मातीत आपला सत्कार होतोय, याचा मला आनंद आहे, हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत. राज्याच्या कामगार कल्याण विभागाच्या सचिवांपासून ते सामान्य शेतकरी महिलेपर्यंत पाच गुणी महिलांना यंदा हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला
पुरुष-महिलांची मोठी गर्दी होती. त्यामुळे अत्यंत चांगल्या
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल अजित पवार यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच त्या कर्तृत्ववान पाच महिलांच्या कामगिरीला सलाम करून दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही दिले. या कार्यक्रमाला उपस्थित असण्याचे पवारांचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!