अपेक्षा होमीओ सोसायटी आणि इन्फोसिस फाउंडेशन द्वारा मेळघाट मधील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वितरण
•मिरर वृत्त
•धारणी प्रतिनिधी
धारणी तालुक्यातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी अपेक्षा होमीओ सोसायटी आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. धारणी तालुक्यातील 110 मुलांना विविध शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पाऊल वाट सुलभ करण्यात आली.
मेळघाटसारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात अनेक मुले शालेय शिक्षणापासून वंचित राहतात. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती, स्थलांतर या कारणांमुळे ही मुले शाळेत नियमित येऊ शकत नाहीत अनेक मुले बकरी चारणे, इतर बालमजुरीच्या कामात गुंतली आहेत. अपेक्षा होमीओ सोसायटी या संस्थेने या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन शालेय साहित्य वितरणाचा हा उपक्रम राबविला आहे.
या कार्यक्रमात दप्तर, नोटबुक, पेन, पेन्सिल, कंपास, चित्रकला साहित्य,पाटी, पाण्याची बॉटल, जेवणाचा डब्बा आणि अंकलिपी असे सर्व आवश्यक शालेय साहित्य मुलांना देण्यात आले. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले.
अपेक्षा होमीओ सोसायटीचे संचालक डॉ. मधुकर गुंबळे यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, “आदिवासी मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. या शैक्षणिक साहित्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळून शाळेत नियमित येतील आणि त्यांचे भविष्य उज्वल होईल.”
नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे मुले खूप आनंदित झाली. त्यांनी या उपक्रमाबद्दल शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी आभार मानले आणि शाळेत नियमित येऊन चांगले शिक्षण घेण्याचे वचन दिले.
या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, पालक वर्ग तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक आणि अपेक्षा होमीओ सोसायटीचे संचालक मा. डॉ. मधुकर गुंबळे, संजीवनी पवार, सोमेश्वर चांदुरकर, विजय राठोड, हर्ष पटोरकर उपस्थित होते.