सराव,सातत्य आणि स्वयं अध्ययनाने स्पर्धा परीक्षेत हमखास यश
◆राज्यसेवा परीक्षेत १७६ वी रँक मिळविणाऱ्या मयूर पोकळे यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
◆मयूर पोकळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी प्रथम आपले ध्येय निश्चित करावे, आपल्या ध्येयनिश्चितीनंतर वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा.सराव, सातत्य आणि स्वयंअध्ययनाने स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळेल असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत १७६ वी रँक मिळवून घवघवीत यश मिळविणाऱ्या नांदगाव पेठ येथील मयूर आनंदराव पोकळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिला.बुधवारी नांदगाव पेठ मध्ये प्रथम आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने मयूर पोकळे यांचा आईवडिलांसह सत्कार केला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून वर्ग १ मधील राजपत्रित अधिकारी होणारा मयूर नांदगाव पेठ मधील पहिला युवक आहे हे विशेष!
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून खासगी क्षेत्रात अभियंता म्हणून चांगल्या पगारावर मिळालेली नोकरी भविष्यात सेवा आणि सन्मानाची संधी देणार नाही त्यामुळे अडीच वर्षे खासगी नोकरी करून सर्वसामान्यांना दर्जेदार सेवा आणि सन्मान मिळविण्याचे ध्येय पुढे ठेवून नांदगाव पेठ येथील मयूर आनंदराव पोकळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवून १७६ वी रँक प्राप्त केली.
नांदगाव पेठ येथील सौ. मंदा व आनंदराव पोकळे यांचे लहान चिरंजीव मयूर याचे दहावीपर्यंत नांदगाव पेठ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण पूर्ण झाले.त्यानंतर श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बारावी पर्यंत शिक्षण घेऊन पी.आर.पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लगेच नाशिक येथील मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर मयूर अभियंता म्हणून रुजू झाला मात्र त्याठिकाणी काम करतांना प्रकर्षाने आपल्या शैक्षणिक अनुभवाचा फायदा गोरगरीब, सर्वसामान्य घटकाला होत नसल्याचे लक्षात आले.
त्यामुळे मयूर ने अडीच वर्षे काम करून तेथील नोकरी सोडली, पुणे गाठले आणि पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाला सुरुवात केली.प्रचंड आत्मविश्वास, अथक परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर मयूर ने नुकत्याच झालेल्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवून १७६ वी रँक प्राप्त केली.लवकरच वर्ग १ मधील राजपत्रित अधिकारी म्हणून मयूर पोकळे रुजू होणार आहे.बुधवारी नांदगाव पेठ येथे आगमन होताच मयूर पोकळे यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे सचिव राजन देशमुख,सय्यद सर,पत्रकार मंगेश तायडे, अरुण राऊत,मंगेश गाडगे, राजेंद्र तुळे, नरेंद्र तायडे सुनील जवंजाळकर आदी उपस्थित होते.