अंतराळातील आयुष्य ही तारेवरची कसरत,आनंद घैसास यांनी व्याख्यानात केला अनेक रंजक गोष्टीचा उलगडा
■मिररवृत्त
■अमरावती
अंतराळवीर होण्यासाठी मजबूत शारीरिक व मानसिक क्षमता तर लागतेच सोबत संपूर्ण आयुष्य पणाला लावण्याची तयारी ठेवावी लागते, असे प्रतिपादन होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त वैज्ञानिक अधिकारी आनंद घैसास यांनी सोमवारी येथे केले.
स्व. सोमेश्वर पुसतकर व्याख्यानमालेत ‘अंतराळातील जीवन’ या विषयावर बोलताना त्यांनी दैनंदिन जीवनातील पाणी पिणे, जेवण करणे, ब्रश करणे, झोपणे या साध्या साध्या गोष्टी करताना अंतराळात किती प्रचंड कसरत करावी लागते, हे अतिशय रंजक शैलीत अनेक व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून सांगितले.
याप्रसंगी त्यांनी मानवाचा अंतराळ प्रवास, वेगवेगळ्या देशाच्या अंतराळ मोहिमा, भारताची या विषयातील प्रगती या विषयावर जवळपास अडीच तास आपल्या वेधक शैलीत खूप सारी नवीन माहिती दिली. याप्रसंगी प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिलीत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. दत्तात्रय पुसतकर कला महाविद्यालयाला ‘नॅक’ द्वारे ‘बी प्लस’ श्रेणीचे मानांकन मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या अध्यक्ष वृषाली पुसतकर, सचिव श्रीकृष्ण बाळापुरे, उपाध्यक्ष बारस्कर कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर हिवसे, प्राचार्य विजय दरणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा माजी आमदार बी. टी. देशमुख व दैनिक ‘जनमाध्यम’ चे संपादक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.