उद्यापासून वीज वितरण कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन
वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीचा एल्गार
अमरावती/प्रतिनिधी
महावितरणचा मुख्य कणा समजल्या जाणाऱ्या वीज लाईन स्टाफ वर वरिष्ठांकडून होत असलेला दबावतंत्राचा वापर तसेच अन्यायकारक वृत्ती यामुळे वीज लाईन स्टाफ ने याविरोधात बंड पुकारले असून उद्या दि.२८ नोव्हेंबर पासून तर ३० नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील सर्व वीज लाईन स्टाफ कर्मचारी असहकार आंदोलन करून विरोधाचा सामना करणार आहे.
धुळे येथे झालेल्या वीज लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात राज्यातील विविध संघटना एकत्र येऊन वरिष्ठांच्या अन्यायकारक धोरणाविरोधात जोमाने एकवटले आहेत.वीज लाईन स्टाफ कर्मचारी यांनी ऑक्टोबर महिन्यापासून आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला असून ३० ऑक्टोबर रोजी महावितरणने दिलेले सिम कार्ड सुद्धा परत करण्यात आले.६ नोव्हेंबर पासून वाहनांना काळे झेंडे लावून सेवेत महावितरणच्या दडपशाहीचा विरोध सुरू केला असून वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना वसुली साठी तगादा लावत आहेत तसेच कार्यवाही करण्याच्या नोटीस बजावत आहे त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना निवेदन देऊन सहकार्याची आणि न्यायाची अपेक्षा केली आहे.
वरिष्ठांनी लाईन वीज स्टाफ कर्मचार्यांवर कोणतीही कार्यवाही करू नये किंवा दबावतंत्राचा वापर करू नये अन्यथा कोणत्याही क्षणी कर्मचारी वर्ग धरणे आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.