राज्य शासनाच्या प्रोत्साहन योजनेतून आधार प्रमाणीकरणासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांचे आवाहन!
पालघर जिल्ह्यातील 151 पैकी 5 खात्यांचे आधार प्रमाणीकरण ; अद्यापही 146 खाती प्रलंबित
●आशिष राणे,वसई●
पीक कर्जाची नियमित परतफेड करण्याऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जवसुली योजनेतून प्रोत्साहनपर लाभ दिला जातो,
या लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने रु.50 हजार दिले जातात.तसेच या लाभासाठी पात्र ठरलेल्या व आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यशासनाने आधार प्रमाणिकरणास दि 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे
दरम्यान या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक असलेला निधी सध्या शासकीय तिजोरीत उपलब्ध आहे. तर हे पैसे योग्य व पात्र लाभार्थ्यांनाच मिळावेत यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.
एकुणच या प्रोत्साहन योजनेतून राज्यभरातील एकूण 33, हजार 356 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी दि.12 ऑगस्ट 2024 ते दि 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत सेवा केंद्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, किंबहुना या कालावधीत 18 हजार 163 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण ही पूर्ण झाले. तरीही अद्याप 15 हजार 193 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आजही प्रलंबित आहे.
या संदर्भात पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले की, दि.9 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेण्याची पालघर जिल्ह्यातील एकूण 151 खाती शिल्लक होती, त्यापैकी केवळ 5 खात्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले असून अद्यापही 146 खाती प्रलंबित आहेत त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी मुदतीत आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी केले आहे
“महाराष्ट्र शासनाची ही शेतकऱ्यांसाठीची प्रोत्साहन योजना आहे त्या अनुषंगाने उर्वरित लाभार्थ्यांना संबंधित बँक व्यवस्थापक व सहकार विभागामार्फत संपर्क साधला जात आहे, उर्वरित शेतकऱ्यांनी सेवा केंद्रावर जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा”.
शिरीष कुलकर्णी
पालघर जिल्हा उपनिबंधक,मुख्यालय