बोरनदी प्रकल्पातुन शेतीकरिता पाणी उपसा करण्याची परवानगी द्या- प्रा. मोरेश्वर इंगळे यांची मागणी
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
येथील बोरनदी प्रकल्पाच्या लगत असलेल्या शेतीमध्ये बोरनदी प्रकल्पातुन पाणी उपसा करण्याची परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन युवासेना जिल्हा सरचिटणीस प्रा.मोरेश्वर इंगळे यांनी उपविभागीय अभियंता अमरावती पाटबंधारे उपविभाग क्र १ यांना दिले.
बोरनदी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे मात्र पाण्याअभावी उत्पादन घेणे कठीण झाले आहे. बाजूला मोठा प्रकल्प असतांना सुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी प्रा.मोरेश्वर इंगळे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यामुळे प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी शेतकऱ्यांसह उपविभागीयअभियंता यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांना होत असलेल्या समस्येबाबत अवगत केले.
शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यास परवानगी द्यावी, उपसा परवानगी शिवाय वीज वितरण कंपनीद्वारे वीजजोडणी सुद्धा होऊ शकत नाही. आज शेतकऱ्यांना या महत्वपुर्ण बाबींची आवश्यकता आहे तसेच वहिवाटीच्या रस्त्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी केली. यावेळी संजय घारे, अरविंद पंडित यांचेसह शेतकरी बांधव उपस्थित होते.