spot_img

सुट्टीवर आलेला सैन्यातील जवान दुचाकी अपघातात ठार , मित्र गंभीर,रहाटगाव टी पॉईंट नजीकची घटना

सुट्टीवर आलेला सैन्यातील जवान दुचाकी अपघातात ठार

◆मित्र गंभीर,रहाटगाव टी पॉईंट नजीकची घटना
◆ट्रकचालक अपघातानंतर फरार, सर्वत्र हळहळ

◆मिररवृत्त

◆नांदगाव पेठ

दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीररीत्या जखमी असल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान रहाटगाव टी पॉईंट नजीक हॉटेल गौरी इन जवळ घडली.अविनाश अंबादास उईके (२४) रा. गणेशपुर ता.वरुड असे अपघातात ठार झालेल्या जवानाचे नाव आहे तर विशाल सुखराम तुमडाम (१९) रा टेंभुरखेडा असे जखमी युवकाचे नाव आहे.घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


चार वर्षांपूर्वी देशसेवेचे व्रत घेऊन अविनाश उईके सैन्यात दाखल झाला.सध्या ओडिसा याठिकाणी अविनाश उईके कार्यरत होता. याठिकाणी एक प्रशिक्षण आटोपून दोन दिवसांपूर्वी अविनाश सुट्टी मिळाल्याने आपल्या गावी गणेशपूर येथे आला.बुधवारी अमरावतीत शिकणाऱ्या आपल्या लहान भावाच्या भेटीसाठी अविनाश आणि विशाल दोघेही दुचाकी क्र.एम.एच.२७,डी.जी.३९४४ ने मोर्शी वरून अमरावती येथे येत असतांना सकाळी ११ वाजताच्या दरम्यान रहाटगाव टी पॉईंट येथे अज्ञात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,जवान अविनाश हा जागीच ठार झाला तर विशाल गंभीर जखमी झाला आहे.
घटना घडताच नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नांदगाव पेठ पोलीसांनी घटनेची तात्काळ दखल घेत घटनेचा पंचनामा केला.पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून अविनाश उईके याने आपले शिक्षण पूर्ण केले व सैन्यदलात भरती झाला.देशसेवेसोबतच आपल्या परिवाराची सुद्धा यानिमित्ताने अविनाश सेवा करायला लागला. लहान भावाच्या शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करून त्याला अमरावती मध्ये शिक्षणासाठी ठेवले.आपल्या लाडक्या भावाला भेटायला जातांनाचा काळाने अविनाश वर अशी झडप घातली की त्याला आपल्या भावाला सुद्धा बघता आले नाही.मोठा भाऊ भेटायला येणार म्हणून भेटीसाठी उत्सुक असलेल्या लहान भावाला आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याने एकच आक्रोश केला यावेळी अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!