संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठीच महासंस्कृती महोत्सव – खा नवनीत राणा
◆महासंस्कृती महोत्सवाचे शनिवारी थाटात उदघाटन
◆सुदेश भोसले यांच्या गीतांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह
◆मिररवृत्त
◆अमरावती
महाराष्ट्राला सांस्कृतिक आणि विविध परंपरेचा वारसा लाभलेला आहे हा वारसा आजच्या युवा पिढीने पुढे घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे.आपली संस्कृती, परंपरा आणि पेहराव खऱ्या अर्थाने जपण्यासाठीच या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन खा. नवनीत राणा यांनी केले.पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग,महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना नवनीत राणा यांनी म्हटले की,स्थानिक कलाकारांमध्ये मोठी क्षमता आहे मात्र त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी पाहिजे तसे व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांच्या कलेला वाव मिळत नाही मात्र पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे असेही त्या यावेळी बोलत होत्या.
शनिवार दि.१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उदघाटन पार पडले. याप्रसंगी महासंस्कृती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी खा. नवनीत राणा यांची उपस्थिती लाभली होती तर उदघाटक म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस महासंचालक रामनाथ पोकळे, महसूल विभागाचे उपायुक्त संजय पवार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश संतोष जोशी, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश वाघमारे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
दीपप्रज्वलनाने महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ झाला. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आपल्या प्रस्ताविकेतुन महासंस्कृती महोत्सवाच्या अयोजनामागील भूमिका विषद केली. लोप पावत असलेली संस्कृती जोपसणे आणि स्थानिक कलावतांना मोठ्या व्यासपीठाची उपलब्धता करून देणे या अनुषंगाने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार उदघाटन प्रसंगी केले.
उदघाटन समारंभानंतर बॉलिवूड चे जेष्ठ पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.या महासंस्कृती महोत्सवाला अमरावतीकरांनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आभार मनपा चे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी मानले.
●ढोल ताशा पथकाने जिंकली अमरावती करांची मने●
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवात ढोल ताशा पथकाच्या सादरीकरणाने अमरावतीकरांची मने जिंकली. पथकातील युवक,युवतींनी महाराष्ट्रीयन पेहराव घालून आपल्या संस्कृतीचे दर्शन देखील या माध्यमातून घडविले.
●सुदेश भोसले यांच्या गीतांवर थिरकले अमरावतीकर●
बॉलिवूड चे जेष्ठ पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या गीतांचा नजराणा महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आला. सुदेश भोसले थेट रंगमंचावरून प्रेक्षकांच्या गॅलरीत पोहचल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता तर अमरावतीकर त्यांच्या गीतांवर देखील थिरकले. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना,ऋषी कपूर अश्या महान अभिनेत्यांवर चित्रित करण्यात आलेल्या अनेक गीतांचा नजराणा सुदेश भोसले यांनी सादर केला.