रहाटगाव येथील बुद्ध विहाराजवळचे अतिक्रमण हटवा
◆सौंदर्यीकरण थांबवण्याची नागरिकांची मागणी
◆मिररवृत्त
◆अमरावती
पंचशील नगर रहाटगाव येथील नालंदा बुद्ध विहाराजवळ आजूबाजूला राहणाऱ्या समाजबांधवांनी अतिक्रमण केलेले असून त्याठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने सौंदर्यीकरण सुरू आहे मात्र याला समाजबांधवांनी विरोध करत आजूबाजूचे अतिक्रमण हटवून मोजमाप केल्यानंतर सौंदर्यीकरण करण्याची मागणी मनपा आयुक्तांना केलेली आहे अन्यथा याविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा सुद्धा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी पंचशील नगरच्या रहिवास्यांनी दिला आहे.
रहाटगाव येथील शेत सर्व्हे क्र.१३९/२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी वसलेली असून याठिकाणी ३२०० स्क्वे.फूट जागा ही नालंदा बुद्ध विहारासाठी सोडण्यात आली होती. त्याठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने समाजमंदिर सुद्धा बनविण्यात आले होते. मात्र आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी येथील जागेवर अतिक्रमण केल्याने ही जागा कमी झाली आहे आणि नव्याने सौंदर्यीकारण सुरू असून ईतर नागरिकांनी या कामाला विरोध दर्शवत आधी जागेचे मोजमाप करा व नंतर सौंदर्यीकरण करा असे कंत्राटदारास बजावण्यात आले मात्र कंत्राटदाराने दखल न घेतल्याने येथील राहिवास्यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्या समक्ष या विषयांवर चर्चा करण्यात आली मात्र मनपा आयुक्तांनीही याबाबत कोणतेही निर्देश दिले नाहीत किंवा तक्रार करणाऱ्या नागरिकांचे समाधान सुद्धा केले नाही.
त्यामुळे संतप्त नागरिकांनी आपली कैफियत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा मांडली असून तातडीने जागेचे मोजमाप करण्यात यावे आणि झालेले अतिक्रमण काढण्यात यावे त्यानंतर सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा सदर बांधकाम रोखण्यात येईल व आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असा इशारा येथील नागरिक कैलास जेठे, राहुल उके, संजय डोंगरे,कुसुम उके, सुनंदा कोसमकर,देविदास जेठे,लक्ष्मण सुखदेवे,दिपक पाटील,वासुदेव गजभिये,विनोद जेठे,युवराज ननावरे,नलु मेश्राम, विकास भोवते,विजय कावरे, माधुरी पाटील,सुधा ननावरे,संगीता जेठे,गोदावरी सुखदेवें,नितीन मेश्राम, ज्ञानेश्वर गेडाम यांनी दिला आहे.