मुंबईतील गुन्हेगारी ठेचणारे हणमंत डोपेवाड नांदगाव पेठचे नवे ठाणेदार
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
मुंबई सारख्या पंचतारांकित शहरातील गुन्हेगारी ठेचणारे तसेच अंमली पदार्थ विरोधात धाडसी कार्यवाही करणारे हणमंत डोपेवाड यांनी नांदगाव पेठ येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला असून नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वठणीवर आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.पहिल्या दिवसापासून त्यांनी परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांना समज दिली तर बिटमधील कर्मचाऱ्यांना सुद्धा अवैध धंद्यांविरोधात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मूळचे नांदेड येथील असलेले हणमंत डोपेवाड १९९३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले.त्यांचा सर्वाधिक कार्यकाळ हा मुंबई पोलिसांत राहलेला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक,गुन्हे शाखा तसेच अंधेरी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले असून त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा कर्दनकाळ अशी त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे.मोठमोठ्या गुन्ह्यातील तपास, बारकावे, तांत्रिक माहिती आणि कायद्याचे सखोल ज्ञान या जोरावर त्यांनी पोलीस विभागात नावलौकिक मिळविला आहे.
गत दोन वर्षांपूर्वी ते मुंबई येथून पोलीस निरीक्षक पदाच्या बढतीवर अमरावती येथे आले.काही वेळ ते नांदगाव पेठ पोलीस स्टेशन मध्ये देखील कार्यरत होते.१ फेब्रुवारी रोजी प्रवीण काळे यांची बदली झाल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार हणमंत डोपेवाड यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदार देण्यात आली.शांत संयमी, अभ्यासू व कायद्याच्या चाकोरीमध्ये राहून काम करणारे हणमंत डोपेवाड यांचे नांदगाव पेठ वासीयांच्या वतीने स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.