चित्ररथातून शासनाच्या विविध योजनांचा जागर
●जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ: जिल्ह्यातील 96 गावात फिरणार चित्ररथ
●मिररवृत्त
●अमरावती
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या एलइडी चित्ररथास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावामध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून आज सकाळी या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, तहसीलदार प्रशांत पडघम, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी श्री. बोडखे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे नियोजन चित्ररथाव्दारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावा-गावात दाखविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावांमध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी केले. चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, नैसर्गिक उत्पादनांचे माहेरघर मेळघाट हाट, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), पशु संवर्धन विभाग, कृषी विभाग, उद्योग विभाग, सहकार विभागातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर लाभ योजना, आयुष्मान योजना, शेतकरी सन्मान योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या एलइडी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे.