संत काशिनाथ महाराज पुण्यतिथीनिमित्य भागवत सप्ताहाला भाविकांची अलोट गर्दी
◆ऑटो युनियनच्या वतीने भाविकांना निःशुल्क सेवा
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
संत काशिनाथ महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला १५ जानेवारी पासून थाटात प्रारंभ झाला.संत काशिनाथ धाम याठिकाणी सुरू असलेल्या भागवत सप्ताहाला दररोज भाविकांची अलोट गर्दी होत आहे.नांदगाव पेठ ते काशिनाथ धाम पर्यंत भाविकांना ने आण करण्यासाठी संत काशिनाथ महाराज ऑटो युनियनच्या वतीने निःशुल्क सेवा देण्यात येत आहे.
दररोज दुपारी १ ते ५ दरम्यान काशीनाथ धाम येथे हभप केशवदादा उकळीकर महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा सुरू आहे. नांदगाव पेठ सह पंचक्रोशीतील भाविक भक्त भागवत कथा श्रवण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत आहेत. महिलावर्गाची लक्षणीय उपस्थिती असून सर्वत्र उत्साह आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.गावात असलेल्या संत काशिनाथ महाराज यांच्या समाधीमंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून भगव्या पताकांनी संपूर्ण गाव सजले आहे.
पहिल्यांदा काशिनाथ धाम येथे भागवत सप्ताह पार पडत असून भाविकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. महिला वर्गाला त्रास होऊ नये म्हणून संत काशिनाथ महाराज ऑटो युनियनच्या वतीने भाविकांसाठी निःशुल्क ऑटो सेवा देखील पुरविण्यात येत आहे.दररोज सकाळ संध्याकाळ संत काशिनाथ महाराज यांची आरती तसेच धार्मिक विधी पार पडत आहे. येत्या २२ जानेवारी ला महाप्रसाद वितरण होणार असून भाविकांनी तसेच गावकऱ्यांनी महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आवाहन संत काशीनाथ महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.