… दादा जरा पुढे सोडून देता का ?
अबालवृद्ध-महिलांची केविलवाणी गळ !
■पायी चालून-चालून थकल्या, जागा मिळेल तेथे बसल्या शेकडो महिला
■असंख्य चारचाकी, दुचाकी व ऑटो रस्त्यातच बंद पडल्याने मनस्ताप
■मिररवृत्त
■अमरावती श्री हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजीत पं. प्रदीप मिश्रा यांच्या अंबेश्वर अंबा शिव महापुराण कथेला शनिवार (ता.१६) पासून श्री शिवाय नमस्तुभ्यम् च्या गजरात उसळलेल्या हजारो महिला-पुरुष भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली. परंतु सदर आयोजन स्थळ हे शहरापासून १० ते १२ किलोमीटर दूर असल्याने या आयोजनस्थळापर्यंत पोहचण्यासाठी चांगल्या-चांगल्यांच्या नाकी नऊ आले. चिक्कार गर्दीतून वाट काढताना शेकडो महिला लांबच-लांब रांगेत पायी चालून-चालून थकल्या, आणि जागा मिळेल तेथे बसल्याचे दिसून आले. इतकेच काय तर या चिक्कार गर्दीतून वाट काढणे कठीण झाल्याने कित्येक तास फक्त रांगत-रांगत पुढे जात असलेल्या गाड्यामधील ३० पेक्षा जास्त चारचाकी, डझनभर दुचाकी, कित्येक ऑटो प्रचंड गरम (इंजिन तापल्याने) झाल्याने धूर सोडीत जागो-जागी बंद पडले. त्यामुळे वाहनचालकांसह कथेसाठी येणाऱ्या शेकडोंना चांगलाच मनस्ताप व पच्छाताप झाला, जो त्यांनी जाहीर बोलूनही दाखवला.
शनिवारी सकाळी १० वाजेपासूनच आयोजन स्थळाकडे जाणाऱ्या वाहनांसह हजारो महिला-पुरुष भाविकांची लांबच-लांब रांग दस्तूर नगर येथूनच सुरु झाली, जी दुपारी दीड वाजे पर्यंत जशीच्या तशी कायमच होती. या कथेसाठी शहरात आणखी कोणती जागा नाही मिळाली का ? इतके दूर पायी चालून आणून भक्तांच्या भावनांशी खेळ करण्यामागचे प्रायोजन काय ? रस्त्यात कुठेच ना पाणी-ना अल्पोपहार ! आयोजकांनी केलेल्या नियोजनाचे काय झाले ? अश्या कित्येक प्रश्नांचा भडीमार हाला -हाल सहन केलेल्या शेकडो महिला-पुरुष व वाहनचालकांनी केला. परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा मदतीस कुणीच धावून न आल्याचेही प्रकर्षाने जाणवले.
■दम भरल्याने रस्त्यावरच ठाण मांडून बसले■
या मार्गावर चालताना जीवाची चांगलीच कसरत झाल्याने व गर्दीत चालून दम भरल्याने कित्येक वृद्ध, महिला, तरुणी नाईलाजास्तव रस्त्यावरच ठाण मांडून बसल्याचे व मदतीच्या प्रतीक्षेत कासावीस झाल्याचे दिसून आले. दरम्यान नेटवर्क जाम झाल्याने कुणाचे फोनही लागत नसल्याने अनेकजण हतबल झाले होते. या मार्गात जागो-जागी मोठं मोठी वाहने खराब होऊन बंद पडल्याने संपूर्ण रस्ता जाम होता तो निराळाच. त्यामुळे असे मोठे आयोजन शहरापासून दूर जन्गलात घेण्यापेक्षा शहरातच घेण्यात आले असते तर बरे झाले असल्याचे अनेकांच्या मुखातून ऐकू आले.