उद्यापासून दोन दिवस युवा संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यात
◆आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वात सरकारवर हल्लाबोल
●मिररवृत्त
●अमरावती
कंत्राटीकरण, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या,असुरक्षित महिला अश्या प्रमुख मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी समविचारी पक्षांनी कंबर कसली असून उद्यापासून दोन दिवस अमरावती जिल्ह्यात सरकारवर निशाणा साधण्यासाठी युवा संघर्ष यात्रेचे आगमन होणार आहे.आ. रोहित पवार या संघर्ष यात्रेचे नेतृत्व करणार असून या युवा संघर्ष यात्रेमध्ये जिल्ह्यातील तमाम युवक, महिला, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरावती शहराध्यक्ष प्रा.डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.
कंत्राटी नोकरभरती रद्द करणे,रिक्त पदे तातडीने भरणे,अवाजवी परीक्षा शुल्क वसुली थांबवणे, युवकांसाठी औद्योगिक विकास व गुंतवणूक साठी प्रभावी धोरण राबविणे, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी आधुनिक तांत्रज्ञानाच्या विशेष योजना राबवाव्यात,शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबवावे, शेतीला नियमित वीजपुरवठा करावा, शाळा दत्तक योजना रद्द करावी, सारथी, बार्टी, महाज्योति, अमृत अश्या संस्थांचे सक्षमीकरण करणे, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा राबवावा, मराठा, धनगर,लिंगायत, मुस्लिम आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अश्या प्रमुख मुद्यांवर ३, ४ व ६ डिसेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यात युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधण्यात येणार आहे.
३ डिसेंबर रोजी या संघर्ष यात्रेचे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा ताथोडा येथून सुरवात होणार आहे. आ. रोहित पवार यांचेसह समविचारी पक्षाचे दिग्गज पदाधिकारी या पदयात्रेत सामील होणार आहे. धानोरा येथून दोनद फाटा, तारखेडा, मनसा मार्गे दुपारी वाढोणा येथे विश्रांती व नंतर सायंकाळी डॉ.पंजाबराव देशमुख जन्मस्थळ पापळ येथे समाप्ती.दि.४ डिसेंबर रोजी धानोरा गुरव येथुम सकाळी ६ वाजता पदयात्रेला प्रारंभ सांगवा गुरव, जावरा, रोहाना नखेड,सावनेर येथुन मार्गक्रमण करत दुपारी नांदगाव खंडेश्वर येथे पोहचेल. त्यानंतर दुपारी फुबगाव व शेलु नटवा येथे येथे ही पदयात्रा समाप्त होणार आहे.६ सहा डिसेंबर रोजी देवगाव येथून यात्रेला प्रारंभ होणार आहे ही यात्रा नंतर वर्धा जिल्ह्यात प्रवेश करेल.
राज्यातील जनतेमध्ये सरकारवर रोष निर्माण झाला असुन समविचारी पक्षाच्या माध्यमातून युवा वर्ग,शेतकरी, महिला, शिक्षक, विद्यार्थी आदींच्या प्रश्नांवर सरकारला उत्तर देण्यास भाग पाडणार आहे. या युवा संघर्ष यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रा.डॉ.हेमंत देशमुख, विनेश आडतिया,रोशन कडू, अमोल गुहाड ,शुभम शेगोकार यांनी केले आहे.