मनोज जरांगे लहान,त्यांना अजून अभ्यासाची गरज
मराठे कधीच ओबीसीतून आरक्षण घेणार नाहीत:नारायण राणे
◆कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावू नये
◆माझ्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते.पण ते ओबीसींचं काढून दिले नव्हते
◆ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला ते देण्यात यावे,या मताचा मी नाही.
●मिररवृत्त
पुणे: मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावू नये. माझ्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते. पण ते ओबीसींचं काढून दिले नव्हते, असे नारायण राणे यांनी म्हटले. ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी नारायण राणे यांना राज्यात सुरु असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाबाबत विचारणा करण्यात आली. यावर नारायण राणे यांनी म्हटले की, कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा ओबीसीची झुंज लावू नये, या मताचा मी आहे. मी मराठ्यांना आरक्षण दिले होते, पण ते ओबीसींचे काढून दिले नव्हते. ५२ टक्क्यांपुढे भारतीय घटनेनुसार सर्वेक्षण करुन एखाद्या समाजाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा हक्क राज्य सरकारला आहे. त्यानुसार मी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. पण ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला ते देण्यात यावे, या मताचा मी नाही. मराठ्यांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे, मराठ्यांमध्ये अनेकजण गरीब आहेत, असे नारायण राणे यांनी म्हटले.
नारायण राणेंचा मनोज जरांगे यांना टोला
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरची डेडलाईन दिली असून ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. याविषयी नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांनी अजून आरक्षणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ते अजून लहान आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्मांना आरक्षण कसं मिळतं, त्यासाठी घटनेत काय तरतुदी आहेत, याचा अभ्यास मनोज जरांगे पाटील यांनी करावा. मराठ्यांना विचारावं, ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा ओबीसीतून आरक्षण कधीच घेणार नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले.