spot_img

पुसला हत्याकांडातील दोन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता , वरुड जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल , अॅड. प्रशांत देशपांडे व अॅड. परवेज खान यांचा यशस्वी युक्तिवाद

पुसला हत्याकांडातील दोन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता

◆वरुड जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

◆अॅड. प्रशांत देशपांडे व अॅड. परवेज खान यांचा यशस्वी युक्तिवाद

◆मिररवृत्त
◆अमरावती

वरुड तालुक्यातील पुसला येथील ३० मार्च २०२१ रोजी घडलेल्या पुरुषोत्तम पाटील यांच्या हत्याकांडातील आरोपी गजानन चौधरी व योगेश जोगेकर यांच्या विरोधात शेंदुरजना घाट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भादवि कलम ३०२, ३४ गुन्ह्यातुन वरुड जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ मार्च रोजी निर्दोष सुटका करण्यात आली.यावेळी आरोपी गजानन चौधरी तर्फे अॅड. प्रशांत देशपांडे यांनी तर आरोपी योगेश जोगेकर तर्फे अॅड. परवेज एम. खान यांनी यशस्वीयुक्तिवाद केला.
दोषारोपपत्रानुसार सरकार पक्षाकडुन तपासण्यात आलेल्या साक्षीदारांनुसार सदर प्रकरणात आरोप होते की, मृतक याचे हमनपेठ शेत शिवारात शेत होते. तेथेच आरोपी गजानन चौधरी व योगेश जोगेकर यांचे सुध्दा शेत होते. २९ मार्च २०२१ रोजी फिर्यादी हे त्यांच्या कामावर गेले व दुपारी १२ वाजता परत आले. परंतु त्यांचे वडील रात्री ९ वाजेपर्यंत घरी आले नाही म्हणुन फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ मोटर सायकलने शेतात वडीलांना पाहण्याकरिता गेले असता शेताच्या रस्त्यावर आरोपी गजानन चौधरी याची मोटरसायकल उभी होती व शेतात आतमध्ये जाऊन पाहिले असता फिर्यादीचे वडील हे जखमी अवस्थेत पडले होते. त्यांच्या नाकातून रक्त वाहत होते व ते मरण पावले होते. त्यानुसार फिर्यादीचे चुलत भाऊ यांनी फोन करुन शे. घाट पोलिस स्टेशनला माहिती दिली व त्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयाण नोंदविले. त्यामध्ये असे समोर आले की, दिनांक २९मार्च २०२१ रोजी रंगपंचमीचा सन असल्याने व त्यानुसार घटनेचे चार साक्षीदार व दोन्ही आरोपी यांनी शेतात पार्टीचे आयोजन केले होते. ते जेवणाची तयारी करित असतांना आरोपी योगेश जोगेकर त्यांच्याकडे आला व त्याने सांगितले की, मृतक पुरुषोत्तम पाटील याने त्याचे डोक्यावर दगड फेकुन मारला व त्यानुसार आरोपी गजानन चौधरी याने काठी उचलली व दोन्ही आरोपींनी पुरुषोत्तम पाटील याला लाथा बुक्यांनी, काठीने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली व घटनास्थळावरुन निघुन गेले. न्यायालयासमक्ष आरोपींविरुध्द दोषारोप सिद्ध करण्याकरिता एकुण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टर व तपास अधिकारी यांचा समावेश होता. सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला की, सरकार पक्षाने आरोपींविरुध्द संशयापलिकडे प्रकरण सिद्ध केले. साक्षीदारांनी दिलेले बयाण तसेच न्याय वैद्यकिय प्रयोगशाळेचे अहवाल यानुसार आरोपींच्या कपड्यावर मृतकाच्या शेतातील माती व कपड्यावर मानवी रक्त आढळून आले व आरोपींच्या शरीरावरसुध्दा जखमा होत्या म्हणुन सरकार पक्षाने आरोपींविरुध्द संशयापलिकडे गुन्हा सिद्ध केला. त्यामुळे दोन्ही आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात यावी.
याऊलट बचाव पक्षातर्फे अॅड. प्रशांत देशपांडे यांनी युक्तीवाद करतांना सांगितले की, पोलिसांसमोर दिलेले बयाण व न्यायालयासमक्ष देण्यात आलेली साक्ष यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली व शेतात काम करणारे शेत मजुर यांच्या कपड्यावर माती व रक्ताचा ए खादा डाग आढळणे पुरावा म्हणुन ग्राह्य धरता येत नाही. कारण या दोन्ही बाबी सहजासहजी काम करतांना शेतमजुराच्या शरीरावर आढळुन येवु शकतात. त्यामुळे सरकार पक्ष आरोपींविरुध्द गुन्हा सिद्ध करु शकला नाही.
अॅड. परवेज खान यांनी युक्तीवाद करतांना न्यायालयाला सांगितले की,संशय आणि पुरावा या दरम्यान खुप मोठा अंतर असतो व फक्तसाक्षीदारांनी आरोप केले म्हणुन ते आरोप ग्राह्य धरता येणार नाही तर ते साक्षीदार कायद्यानुसार विश्वासपात्र ठरतात का हे पाहणे गरजेचे आहे. फक्त रक्ताचे डाग आढळले हा पुरावा सिद्ध होत नाही. जेव्हापर्यंत कायद्याने ठरवुन दिलेल्या पद्धतीनुसार तो सिद्ध होत नाही.
सदर प्रकरणात पोलिसांकडुन योग्य कायदेशीर पद्धतीचा अवलंब झाला नाही व दोन्ही वकिलांनी आपल्या युक्तीवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्यान्यायनिर्णयाचे दाखल दिले.दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून संशयाचा फायदा देत आरोपीची निर्दोष सुटका केली. सदर प्रकरणात आरोपी गजानन चौधरी यांच्या वतीने अॅड. प्रशांत देशपांडे यांनी तर आरोपी योगेश जोगेकर यांच्या वतीने अॅड. परवेज एम. खान यांनी यशस्वी युक्तिवाद केला. अॅड. मोहित जैन व गणेश गंधे, अॅड. अनिल जयस्वाल, अॅड. वसीम शेख, अॅड. सचिन बाखडे, अॅड. शहेजाद शेख, अॅड. रियाज रुलानी, अॅड. अजहर नवाज, अॅड. संदीप कथलकर व अॅड.अंकिता जयस्वाल यांनी सहकार्य केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!