spot_img

नांदगाव पेठ जवळ थरार.. दरोडेखोरांनी केला ट्रॅव्हलरवर गोळीबार, ट्रकचालकाचे अपहरण करून पळविला ट्रक

नांदगाव पेठ जवळ थरार….

दरोडेखोरांनी केला ट्रॅव्हलरवर गोळीबार, ट्रकचालकाचे अपहरण करून पळविला ट्रक

◆चार जण जखमी, दहा हजार रुपये लुटले
◆दरोडेखोरांचा शोध सुरू

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

शेगाव येथून दर्शन आटोपून नागपूर येथे परत जाणाऱ्या ट्रॅव्हलर वाहनावर रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान शिवणगाव नजीक काही अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार केल्यानंतर दरोड्याचा प्रयत्न फसल्याने दरोडेखोरांनी परत नांदगाव पेठ कडे कूच करत सावर्डी नजीक असलेल्या बोगद्याजवळ एका ट्रकला अडवून चालक व वाहकाचे अपहरण केले त्यानंतर त्यांच्याजवळची दहा हजार रुपयांची रोकड लंपास करून ट्रक देखील पळवून नेल्याची थरारक घटना उघडकीस आली.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की,मानेवाडा नागपूर येथील चार ते पाच कुटुंबातील १७ सदस्य रविवारी सकाळी ट्रॅव्हलर क्र. एम.एच १४,जी.डी.६९५५ ने शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. तेथील दर्शन आटोपून ते रात्री अमरावती येथील अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेले आणि जेवण करून राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथून नागपूर कडे जातांना रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान शिवणगाव जवळ बोलेरो मधून दोघाने ट्रॅव्हलरवर अंधाधुंद गोळीबार केला.चालकाच्या बाजूला असलेल्या खिडकीमधून बंदुकीमधील एक गोळी चालक खोमदेव केशवराव कवडे (३९) रा.झिंगाबाई टाकळी, नागपुर यांच्या हाताला स्पर्श करून गेली तर तीन गोळ्या प्रवाश्यांच्या दिशेने भिरकावण्यात आल्या.अचानक झालेल्या या प्रकाराने चालकासह प्रवासी सुद्धा भयभीत झाले.यामध्ये चालक खोमदेव कवडे,राकेश कनेर यांच्यासह दोन लहान मुले देखील जखमी असल्याची माहिती आहे.
चालकाने प्रसंगावधान साधून तातडीने तेथून वाहन थेट तिवसा येथे आणले. घटनेची माहिती कंट्रोल रूम ला मिळताच नांदगाव पेठ आणि तिवसा पोलिसांना सूचना देण्यात आल्या. तिवसा पोलिसांनी तातडीने जखमींना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.ट्रॅव्हलर वाहनामध्ये लहान मुलांसह जेष्ठ नागरिक सुद्धा होते. घटनेने परिवारातील सर्व सदस्य भयभीत झाले होते. दरोडा टाकण्याच्या मनसुब्याने हा हल्ला करण्यात आला असा प्राथमिक अंदाज आहे.ट्रॅव्हलर वाहनावरील दरोड्याचा प्रयत्न फसल्याने दरोडेखोर परत नांदगाव पेठ च्या दिशेने निघाले.रात्री दीड वाजताच्या सुमारास सावर्डी येथील उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळ रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामध्ये जाणाऱ्या ट्रक क्र.डब्ल्यूबी-५३-सी-२७२४ ला अडविले आणि बंदुकीच्या धाकावर बुलोरामधील तिघांनी ट्रकचालक रवींद्र नामदेव बलखंडे (४०) रा.इंदिरानगर, कळमनुरी, हिंगोली व वाहक रवींद्र यांचाच पुतण्या किरण कैलास बेलखंडे, रा.हिंगोली दोघांना ट्रकमधून खाली ओढले. दोन लुटारू ट्रकजवळच थांबले. अन्य लुटारूंनी रवींद्र व किरण यांना बुलोरोमध्ये कोेंबून, त्यांच्या कनपट्टीला बंदूक लावून दुर रस्त्याच्या बाजूला मोकळया परिसरात नेले. लुटारूंनी हवेत दोन वेळ गोळीबार करून दोघांजवळील १० हजाराची रक्कम काढली. त्यानंतर त्यांच्याच कपडयांनी त्यांचे हातपाय बांधून बाहेर निघाल तर बंदुकीने गोळ्या घालून मारण्याची धमकी देऊन लुटारू पळून गेले. दोन तास जीव मुठीत घेऊन लपल्यानंतर रवींद्र, किरण ट्रकजवळ आले असता त्यांना ट्रक देखील गायब दिसला. लगेच ही दुसरी तक्रार आल्यानंतर नांदगावपेठ पोलिसांच्या पायाखालीची वाळू सरकली. याबाबत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हे दाखल केले असून पोलीस पुढील तपास करित आहेत.दोन दिवसांपूर्वी नांदगाव पेठ बस स्टॅन्ड वर सुद्धा हवेत गोळीबार केल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे.पोलिसांनी याबाबत सतर्क राहून कार्यवाही करणे आवश्यक आहे.

◆पोलिसांची शोधमोहीम अन दरोडेखोरांचा कारनामा◆

राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हलर वर गोळीबार केल्याची घटना पोलिसांना समजताच नांदगाव पेठ व तिवसा पोलिसांनी दरोडेखोरांची शोधमोहीम सुरू केली मात्र याच दरम्यान महामार्गावर दरोडेखोरांनी ट्रकचालकांचे अपहरण करून त्यांच्याजवळून दहा हजारांची रोकड व ट्रक देखील पळवून नेला. या प्रकाराने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!