महिलादिन: महिला पोलीसांच्या धाडसत्रात अवैध देशी दारू जप्त
◆डवरगाव येथून १५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात,आरोपी अटक
◆मिररवृत्त
◆माहुली जहागीर
महिलादिनी माहुली जहागीर पोलीस स्टेशन अंतर्गत डवरगाव येथे महिला पोलिसांनी मारलेल्या धाडीत अवैधरित्या विक्री करत असलेल्या देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.या कार्यवाहीमध्ये सर्व महिला कर्मचारी सहभागी होत्या आणि पहिल्यांदा महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.कार्यवाही मध्ये देशी दारूच्या १५ व पावट्या असा एकूण १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शुक्रवारी महिला दिन असल्यामुळे माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू पांडे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनचा कारभार सोपविला होता. त्या अनुशंगाने सायंकाळी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, डवरगाव येथील एका महिलेच्या घरी अवैधरित्या देशी दारू विक्री सुरू आहे. त्या आधारे ठाणेदार विष्णू पांडे यांच्या मार्गदर्शनात म.पो.कॉ. रीना पारधी,म.पो.कॉ.वर्षा कुरवाडे,म.पो.कॉ.राणी तायडे,व सोबत पो.हे.कॉ. गजानन धर्माळे यांनी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सापळा रचून डवरगाव येथे धाड टाकली व देशी दारूच्या विना परवाना विक्री करत असलेल्या १५ पावट्या एकूण १५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात आली.म.पो.कॉ उज्ज्वला खैरकर यांच्या फिर्यादीवरून महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.