स्तन कर्करोगग्रस्त शेकडो रुग्णांवर निदान व उपचार
◆तज्ञ वैद्यकीय चमूने केले निदान, रुग्णांनी मानले आभार
◆मिररवृत्त
◆अमरावती
येथील कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे गुरुवारी शेकडो कर्करोगग्रस्त रुग्णांवर निःशुल्क निदान व उपचार करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका, सुजान कॅन्सर हॉस्पिटल अमरावती व अमरावती कॅन्सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो रुग्णांनी या निःशुल्क शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजेंद्रसिंग अरोरा,रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या अध्यक्षा
डॉ.मोनाली ढोले,सुरेश मेठी,डॉ नीता अरोरा,डॉ उषा गजभिये,सुधा तिवारी,सचिव अमोल चवणे, कीर्ती बोडखे,चंदा जैन आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ.राजेंद्रसिंग अरोरा यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, बदललेली जीवनशैली आणि आरोग्याबाबत जागरूक नसणे यामुळे आपण भयंकर रोगाच्या सावटात सापडतो मात्र महिला भगिनींनी घाबरून न जाता सकारात्मकता,जिद्द आणि संयम या गोष्टी बाळगल्या तर अश्या भयंकर रोगांना आपण पळवून लावू शकतो असे ते म्हणाले तर डॉ. मोनाली ढोले यांनी कर्करोगग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,कोणत्याही प्रकारचा कर्करोग असेल तर त्या रोगावर आपण निश्चितपणे नियंत्रण मिळवू शकतो.रुग्णांनी स्वतः काळजी घेणे महत्वाचे असून औषधोपचाराने कर्करोगाचा नक्कीच सामना करता येतो असे त्या यावेळी म्हणाल्या.उपस्थित सर्व वैद्यकीय चमुंनी सुद्धा रुग्णांना मार्गदर्शन केले व त्यांना धीर दिला.
शिबिरात आलेल्या रुग्णांवर विदर्भातील प्रसिद्ध कर्करोग तज्ञांनी निःशुल्क उपचार आणि निदान करून रुग्णांना सन्मानजनक आधार दिला. यावेळी डॉ. समीर केडीया, अतुल कोल्हे, अखिलेश खेतान, सुकेश ढोले, डॉ. सीमा सुने, डॉ. अनघा कलोती, डॉ.वर्षा अग्रवाल, डॉ.प्रतिमा पवार, आनंद काशीकर, आशिष लांडगे, गौरव कडू यांचेसह मान्यवर मंडळी उपस्थित होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधा तिवारी तर आभार प्रदर्शन अमोल चवणे यांनी केले.
◆कर्करोगावर मात करणाऱ्या भगिनींचा सत्कार◆
कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वैद्यकीय सल्ला आणि नियमित औषधोपचाराने आठ महिलांनी मात मिळविली.यामध्ये जया शेंडे, सीमा तायडे, महानंदा गुजर, जयश्री गोतमारे,नजमा बी, नीता सिस्टर, हलीमा बी, सै.करम, नीता यांचा समावेश असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या सर्व धाडसी महिलांचे कॅन्सर हॉस्पीटल व रीसर्च सेन्टर व रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.