spot_img

नवनीत राणांना भाजपमधूनच विरोध,पुन्हा घड्याळ बांधणार! , आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीची चर्चा

नवनीत राणांना भाजपमधूनच विरोध,पुन्हा घड्याळ बांधणार!

◆आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीची चर्चा

◆मिररवृत्त
◆अमरावती

खासदार नवनीत राणा येणारी लोकसभा निवडणुक एनडीए समर्थीत अपक्ष लढतात की भाजपाची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरतात, याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच आता नवी चर्चा समोर आली आहे. त्या राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन निवडणुक लढवू शकतात,अशी ती चर्चा असून सदर पर्यायावर राणा दाम्पत्य गंभीरतेने विचार करीत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
राणा दाम्पत्याचा राजकीय प्रवास जेव्हापासून सुरू झाला, तेव्हापासून त्यांची जवळीक काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत राहीली आहे. 2009, 2014, 2019 अशा तिन्ही विधानसभा निवडणुकीत रवि राणा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठींबा दिला आहे. 2014 मध्ये तर राष्ट्रवादीने नवनीत यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती.घड्याळ चिन्हावर लढलेल्या या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विजयी झाले होते. 2019 मध्ये नवनीत अपक्ष मैदानात उतरल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने त्यांना पाठींबा दिला होता.या निवडणुकीत त्या आनंद अडसूळ यांना पराभूत करून विजयी झाल्या होत्या. नवनीत राणा काही दिवसातच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची म्हणजेच युपीएची साथ सोडून भाजपाच्या नेतृत्वातल्या एनडीए सरकाराला समर्थन दिले होते.तेव्हापासून त्या व त्यांचे पती एनडीएच्या सोबत आहे. हिंदुत्वाचा आवाजही त्यांनी दरम्यानच्या काळात बुलंद केला.हनुमान चालिसा प्रकरणावरून त्यांना तुरूंगातही जावे लागले. नव्या लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहत असल्याने त्या भाजपाची उमेदवारी घेऊन लढतील किंवा एनडीए समर्थीत अपक्ष लढतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. दूसरे महत्त्वाचे म्हणजे भाजपाच्या बहुतांश स्थानिक पदाधिकाऱ्यांचा नवनीत यांना भाजपात घेण्याला आणि उमेदवारी देण्याला विरोध आहे. समर्थन देण्याबाबत पदाधिकारी मवाळ आहेत. स्थानिक शिवसेनेचाही विरोध आहे.आता नवनीत राणा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढण्याबाबत गंभीर असल्याची नवी चर्चा आहे. पण, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाचा त्यांच्यासोबत जुनाच अबोला आहे. गेल्या साडेचार वर्षातल्या राणा दाम्पत्याच्या नव्या राजकीय भूमिकेमुळे समिकरणे बदलली असून स्थानिक राजकीय घडामोडीने राणा दाम्पत्य गोंधळले आहे.विजयासाठी कोणता पर्याय निवडावा यावर त्यांच्याकडून गहन विचार होत आहे.

◆सहानुभूती लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न◆

एरव्ही नवनीत राणा यांनी घरात चकल्या जरी बनवल्या तरी डझनभर चॅनल त्यांच्या अवतीभवती असते आणि चकल्या कुरकुरीत झाल्याचे दिवसभर टीव्हीवर प्रसारण केल्या जाते मात्र खासदार महोदयांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची बाब माध्यमांना माहीत होऊ नये हे न उलगडणारे कोडे आहे. गेल्या एक महिन्यापासून त्या काठी घेऊन कधी व्हील चेयर वर वरून नागरिकांना संबोधित करत आहे यावरून नक्कीच सहानुभूती लाटण्याचा त्या केविलवाणी प्रयत्न करत आहेत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.आता तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा कॉल हा सुद्धा त्यातलाच भाग असल्याची चर्चा आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!