जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सुरुवात
◆जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
◆मिररवृत्त
◆अमरावती
निवडणूकीसाठी नवतंत्रज्ञानाचा वापर, नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, 12 डी अर्ज, राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, मृत मतदारांची नावे वगळणे यासह निवडणूकविषयक विविध विषयांचा आढावा आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. कटियार यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.
भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा प्रशानाने नेमून दिलेल्या जाबाबदाऱ्या आणि कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी कैलास घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे आदी यावेळी उपस्थित होते.
आगामी निवडणूकीसंदर्भात जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन व त्याअनुषंगाने मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. इव्हीएम संदर्भात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा. निवडणूक आयोगाचे अनेक ॲप्स असून या ॲप्सची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याशी संबंधित अधिकारी तसेच सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाने स्ट्राँगरुम तसेच मोजणी कक्षाची दुरुस्ती आणि अनुषंगिक तयारी तातडीने पूर्ण करावी. सहायक निवडणूक अधिकारी यांनी (एआरओ) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करावे. सीमावर्ती जिल्ह्यांच्या बैठका घ्याव्यात, एक खिडकी योजना, सी-व्हिजिल, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सायबर सुरक्षितता, नियंत्रण कक्ष आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.
निवडणूक कामांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे आदेश काढून त्यांच्यावर विवक्षित कामांची जबाबदारी सोपवावी. मतदार यादीत अद्यायावत होण्यासाठी निवडणूक विभागाला सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.