महिलांची सामाजिक जनजागृती गरजेची- जिल्हाधिकारी
◆जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांचा मोठा सहभाग
◆मिररवृत्त
◆अमरावती
कायदा आणि इतर सर्वच विषयांमध्ये महिलांची सामाजिक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ते बोलत होते.
जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती (पीसीपीएनडीटी कक्ष) आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख ह्या होत्या. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी सांगितले की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. कोणतेही लक्ष गाठण्यासाठी परिश्रम महत्त्वाचे असून त्याच्यासाठी सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी महिलांना असलेल्या समस्या व त्यावरील उपाय यासह सध्या विविध समस्यांना युवकांनी कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले. ‘सामाजिक जनजागृती शिवाय महिलांचे कायदे हे रिकामे दस्तऐवज आहे’या विषयावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषक समाज कार्य महाविद्यालय बडनेरा येथील अनिकेत महल्ले यांनी पटकाविले. द्वितीय पुरस्कार कृष्णा नलवाडे,तर तृतीय पुरस्कार क्षमा इंगोले यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड शिरीष जाखड,अँड अमित सहारकर आणि डॉ. सुयोगा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी सी पी एन डी टी च्या समन्वयक तथा विधी समुपदेशक ऍड प्रणिता भाकरे, संचालन प्रा.सपना विधळे, तर आभार प्रदर्शन प्रा.संदीप वानखडे यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.