spot_img

राणा दाम्पत्याने पळविले नांदगाव पेठ येथील शासकीय मेडिकल कॉलेज- आ. यशोमती ठाकूर

राणा दाम्पत्याने पळविले नांदगाव पेठ येथील शासकीय मेडिकल कॉलेज- आ. यशोमती ठाकूर

●गावकऱ्यांमध्ये असंतोष, यशोमती ठाकूर संतापल्या

●नांदगाव पेठ

पालकमंत्री असतांना यशोमती ठाकूर यांनी मंजूर केलेले शासकीय महाविद्यालय व रुग्णालय राणा दाम्पत्यांनी पळविल्याने आ.यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. आम्ही विकासकामांसाठी परिश्रम करायचे आणि राणा दाम्पत्याने आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या एवढेच ते करू शकतात असा घणाघाती आरोप आ.यशोमती ठाकूर यांनी सोमवारी नांदगाव पेठ येथील हळदी कुंकू कार्यक्रमात केला.
राष्ट्रीय महामार्ग असल्याने तसेच नांदगाव पेठ ला शेकडो गावांचा वेढा असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा मिळाव्यात, महामार्गावरील अपघातग्रस्तांना जीवनदान मिळावे यासाठी मोठ्या परिश्रमाने २०२१ मध्ये तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नांदगाव पेठ मध्ये १८.५३ हेक्टर जागेवर १०० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर केले होते.तज्ज्ञांच्या समितीने मान्यता सुद्धा दिली होती, नियोजित जागा ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’च्या निकषांनुसार योग्य असल्याची माहिती तज्ज्ञांच्या समितीने दिल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निर्मितीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला होता मात्र अचानक सरकार बदलले आणि राणा दाम्पत्याने राजकीय बळाचा वापर करून आ. रवी राणा यांच्या मतदार संघातील अंजनगाव बारी येथे हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पळविले.


सोमवारी नांदगाव पेठ मध्ये हळदी कुंकू कार्यक्रमात एका महिलेने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबतीत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आ. यशोमती ठाकूर यांनी हा आरोप केला मात्र नांदगाव पेठ मधील नागरिकांनी याचा विरोध न केल्याने त्यांनी यावेळी आपली खंत सुद्धा व्यक्त केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नांदगाव पेठ मध्ये झाले असते तर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव मिळाले असते, तरुणांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या असत्या शिवाय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला असता मात्र गावकऱ्यांनी आपल्या हक्काच्या विकासकामासाठी विरोध सुद्धा दर्शविला नाही ही मोठी खंत असल्याचे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.


कोण काय करते यापेक्षा आपण सामान्य जनतेसाठी काय करतो हे महत्वाचे आहे.लवकरच आपली सत्ता येईल आणि पुन्हा नांदगाव पेठ वासीयांसाठी विकासाची गंगा आणू असेही आश्वासन यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित भगिनींना दिले. यावेळी विचारपिठावर कृ.उ. बा. स. सभापती हरीश मोरे, सरपंच कविता विनोद डांगे, माजी पं स. उपसभापती बाळासाहेब देशमुख, ग्रा.पं.सदस्य वृषाली इंगळे, उर्मिला गायगोले,विभा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते राजेश बोडखे,पंकज शेंडे ,शशी बैस, भाऊराव कापडे,मुकुंद पांढरीक, मंगेश आवारे,नंदू कुकडे,अविनाश यावले, अनिल गोल्लरकर,विनोद सुने,विशाल देशमुख यांनी परिश्रम घेतलेयांचेसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

◆परी हु मै कार्यक्रमात महिलांची तौबा गर्दी◆

आ. यशोमती ठाकूर यांच्या वतीने परी हु मै कार्यक्रमाचे सोमवारी नांदगाव पेठ ग्रामपंचायत पटांगणात आयोजन करण्यात आले होते. महिलांचे हळदी कुंकू करून त्यांना वाण सुद्धा देण्यात आले. या कार्यक्रमाला हास्य सम्राट मंगेश ठाकरे यांनी एक मिनिटं शो आणि प्रश्नमंजुषा कार्यक्रमांतर्गत महिला वर्गाचे मनोरंजन केले व त्यांना भेट वस्तू सुद्धा दिल्या.या कार्यक्रमाला महिला वर्गाची प्रचंड गर्दी होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!