महिला शिक्षिकेच्या हत्याकांडातील शिक्षक आरोपी निर्दोष
◆ऍड.परवेज खान यांचा यशस्वी युक्तिवाद
◆अमरावती
◆मिररवृत्त
२०१७ मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येणस येथे घडलेल्या बहुचर्चित शिक्षिकेच्या हत्याकांडातील आरोपी शिक्षकपती निर्दोष असल्याचा निकाल गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालय अमरावतीने दिला.याप्रकरणी ऍड.परवेज खान यांनी यशस्वी युक्तिवाद करत सत्य व पुराव्याच्या आधारावर त्या शिक्षकास निर्दोष सिद्ध केले.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की,घटनेच्या १४ वर्षांपूर्वी किर्तीराज नामदेव इंगोले यांचे मृतक शिक्षक महिलेशी विवाह झाला होता.घटनेच्या काही वर्षांपासून शिक्षक पत्नी व पतीमध्ये अनैतिक संशयावरून खटके उडत असल्याने दोघेही विभक्त झाले होते. सदर महिलेने आरोपीविरुध्द नांदगांव खंडेश्वर न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये खटला सुध्दा दाखल केला होता.त्यांनतर ७ नोव्हेंबर २०१७ रोजी शिक्षक महिलेचे प्रेत नांदगाव खंडेश्वर ते येणस मार्गावर आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती.मात्र घटनेच्या दिवशी किर्तीराज इंगोले व मृतक शिक्षक महिला यांना एकाच वाहनावर जातांना अनेकांनी बघितले होते व तशी साक्ष सुद्धा नोंदविण्यात आली होती.
गुरुवारी या हत्याकांडाची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असतांना सरकार पक्षातर्फे एकुण १८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी एकही साक्षीदार फितुर झाले नाही व सर्व साक्षीदारांनी सरकार पक्षातर्फे साक्ष दिली. साक्षीदारांनी दिलेली साक्ष व तपासादरम्यान मिळुन आलेले पुरावे या आधारे सरकार पक्षाकडुन युक्तीवाद करण्यात आले की, घटना तारखेला आरोपीने शाळेतुन रजा घेतली होती व सर्व साक्षीदारांनी आरोपीविरुध्द साक्ष दिली त्यामुळे आरोपीविरुध्द सदर
प्रकरण संशया पलिकडे सिद्ध झाले व आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे युक्तीवाद करण्यात आले.
याऊलट बचाव पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आले की, फिर्यादीने दिलेली फिर्याद व न्यायालयासमोर दिलेली साक्ष यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळुन आली आणि साक्षीदारांनी दिलेली साक्ष सुध्दा ही बाब सिद्ध करीत नाही की घटना तारखेला आरोपी हाच मृतकासोबत दिसणारा शेवटचा व्यक्ति होता. बचाव पक्षातर्फे युक्तीवादाचे समर्थनार्थ सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय सुद्धा देण्यात आले.दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीला निर्दोष सोडले.अॅड. परवेज एम. खान यांनी आरोपीची बाजु मांडली तर त्यांना अॅड. अनिल जयस्वाल, अॅड. वसीम शेख, अॅड. सचिन बाखडे, अॅड. शहेजाद शेख, अॅड. रियाज रुलानी, अॅड. अजहर नवाज व अॅड. संदीप कथलकर यांनी सहकार्य केले.