spot_img

मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरण , परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापकासह सात आरोपींना अटक

मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरण
परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापकासह सात आरोपींना अटक

◆पोलीस व गुन्हेशाखेची मोठी कार्यवाही
◆अटक आरोपींची संख्या झाली दहा

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून या प्रकरणाची तक्रार करणारा एकमेव फिर्यादी व ए.आर.एन असोसिएट या परीक्षाकेंद्राचा व्यवस्थापक मयूर बडगुजर यांच्यासह सात आरोपींना नांदगाव पेठ पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील आरोपींची संख्या आता दहा झाली आहे.या प्रकारानंतर नांदगाव पेठचे ठाणेदार हणमंत डोपेवाड व गुन्हे शाखेच्या वतीने याप्रकरणाला गंभीरपणे हाताळण्यात येत असून लवकरच मुख्य सूत्रधार गजाआड असणार अशी आश्वासक प्रतिक्रिया यावेळी पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड यांनी दिली.
२१ फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड नांदगाव पेठ येथील ए.आर.एन असोसिएट या परीक्षाकेंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरला संबधीत विभागाचे अधिकारी प्रशांत आवंदकर यांनी यश कावरे या उमेदवाराला नक्कलच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे लिहून दिल्याने पेपरफुटीचे प्रकरण चव्हाट्यावर आले.परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी केलेल्या गोंधळानंतर ए.आर.एन असोसिएट चे व्यवस्थापक मयूर बडगुजर यांनी याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर यश कावरे याला अटक करण्यात आली होती.
पोलीस या प्रकरणाला गांभीर्याने घेत असून दररोज नवनवीन खुलासे या प्रकरणातून बाहेर येत आहे.२६ फेब्रुवारी रोजी राहुल लिंगोट व किशोर डोंगरे या दलालांना अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी रात्री मुख्य फिर्यादी असलेला मयूर रवींद्र बडगुजर (वय ३३) राहणार झेंडा चौक, राजापेठ अमरावती,स्वप्नील राहुल साळुंखे (वय ३२) दत्तकृपा कॉलनी,मार्डी रोड अमरावती, प्रतीक जुगलकिशोर राठी (वय ३०) राहणार साईनगर अमरावती,संगमेश्वर नामदेव सरकाळे (वय २५) राहणार किशोर नगर, भगतसिंग चौक अमरावती, उद्देश विनोद काळबांडे (वय २५) राहणार गोपाल नगर अमरावती, रोहन जयप्रकाश अडसड (वय ३६) राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड अमरावती, शंतनु सुनील बर्वे (वय २०)डवरगाव, अमरावती या सात आरोपींना अटक करण्यात आली.
पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आजवर दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून लवकरच मुख्य सूत्रधार पकडण्यात पोलिसांना यश मिळेल असे दिसत आहे परंतु या प्रकरणातील नक्कल पुरविणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंदकर अजूनही पोलिसांना गवसला नाही हे न समजणारे कोडे आहे. परंतु पोलीस दोन्ही बाजू समजून घेऊन योग्य दिशेने तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड यांनी माध्यमांना दिली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!