विद्यार्थ्यांनो, वाईट विचार आणि प्रवृत्तीला निरोप द्या-प्रा. आशिष भांडे
श्री.अकॅडमीच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना कानमंत्र
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
आपल्याला चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपले आईवडील अपार कष्ट करतात.आपला पाल्य केवळ एक चांगला व्यक्ती व्हावा एवढीच त्यांची इच्छा असते मात्र अनेक विद्यार्थी केवळ वाईट संगती मुळे आईवडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरतात आणि भविष्य खराब करतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो केवळ आईवडिलांचे लहानशे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी आपण वाईट विचार आणि वाईट प्रवृत्ती यांना निरोप द्या असा कानमंत्र प्रा.आशिष भांडे यांनी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
श्री.अकॅडमीच्या बाराव्या वर्धापन दिनी शनिवारी नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.आशिष भांडे यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंजाबराव सुंदरकर हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार राजन देशमुख,आदर्श शिक्षक संदीप अकोलकर,प्राचार्य वाठ,प्रा ददगाळे,प्रा.सोनी, पत्रकार मंगेश तायडे, दिनकर सुंदरकर,प्रा मोरेश्वर इंगळे,अरुण राऊत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अकॅडमी चे प्रा. शशांक वाठ यांनी केले. दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी शर्वरी किशोर साखरवाडे, उत्सवी धर्मे, युगा झगडे तसेच गुणवंत विद्यार्थी रोशनी शहाकार,संजना बेहरे, तनुजा इंगोले,रोहित सुने, मुग्धा यावले,समृद्धी बेहरे,जान्हवी शेंडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धा आणि खेळ यामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.विचारपीठावरील संदीप अकोलकर, मंगेश तायडे, दिनकर सुंदरकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अकॅडमीच्या रीना वाठ यांचेसह नववी च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पूर्वा हिंगणकर, तनुजा इंगोले यांनी केले तर आभार ओम राऊत याने मानले.उपस्थित दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
●दप्तरात विद्यार्थ्यांचे भविष्य-प्रा.इंगळे●
विद्यार्थ्यांना शाळेत किंवा शिकवणीला पाठविणे एवढेच पालकांचे कर्तव्य नाही तर आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे त्यांचे शाळेचे दप्तर दररोज तपासणे हे सुद्धा पालकांचे कर्तव्य आहे. त्यांच्या दप्तरात त्यांचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ दडलेला असतो त्यामुळे दप्तर तपासणे आज गरजेचे असल्याचे मत प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी व्यक्त केले.