मुंबई हादरली!शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू
◆मुंबई पोलिसांकडून माहिती
◆मिररवृत्त
◆मुंबई
अभिषेक घोसाळकरांवर आज (दि.8) सायंकाळी दहिसर परिसरात गोळीबार झाला. यानंतर त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ANI ने दिलं आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केल्याचं वृत्त आहे. तसंच, हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे दहिसर हादरले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तर रुग्णालय परिसर सील करण्यात आला आहे.
◆नेमकं काय घडलं?◆
अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमाकरता मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात बोलावलं होतं. या कार्यक्रमाचं मॉरिस यांनी त्यांच्या फेसबुकवरून लाईव्ह केलं. फेसबुक लाईव्हवरून संवाद संपल्यानंतर सुरुवातीला मॉरिस उठून निघून गेला. त्यानंतर, अभिषेक घोसाळकर लाईव्हद्वारे संवाद साधत होते. “ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”, असं अभिषेक घोसाळकर फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होते. त्यांचा हा संवाद संपताच अभिषेक घोसाळकरही जागेवरून उठले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार झाला. ते उठून गेल्यानंतर गोळ्यांचा आणि ओरडण्याचा आवाज व्हीडिओतून येत आहे. एवढंच नव्हे तर गोळीबार झाल्यानंतरही फेसबुक लाईव्ह पाऊणतास सुरूच होतं.
गोळीबार झाला तेव्हा तिथे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे गोळीबार होताच याची माहिती अभिषेक घोसाळकर यांचे वडील आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांना देण्यात आली. क्रिडा कार्यक्रमाकरता विनोद घोसाळकर, अनंत गिते आणि माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद गेले होते. परंतु, या गोळीबाराची घटना समजताच ते घटनास्थळी पोहोचले. तसंच, अभिषेक घोसाळकर यांना तातडीने जवळच्याच करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
●अभिषेक घोसाळकर कोण होते?●
ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते सुपूत्र होत. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते.
●हल्लेखोर मॉरिसचाही मृत्यू●
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
●कोण होता मॉरिस?●
मॉरिस नावाचा इसम दहिसर बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे.गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.