spot_img

नांदगाव पेठ वासीयांच्या प्रेमाने भारावून गेलो-प्रवीण काळे ,पो.स्टे च्या वतीने ठाणेदार काळे यांना निरोप

नांदगाव पेठ वासीयांच्या प्रेमाने भारावून गेलो-प्रवीण काळे

●पो.स्टे च्या वतीने ठाणेदार काळे यांना निरोप
●पोलीस पाटील, गावकरी,पत्रकार यांची उपस्थिती

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

खात्यात विविध ठिकाणी नोकरी केली मात्र नांदगाव पेठ मध्ये तीन वर्षे काम करतांना येथील नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रेमाने आपण खूप भारावून गेलो अशी भावनिक प्रतिक्रिया नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी निरोप समारंभ प्रसंगी व्यक्त केली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणेदार प्रवीण काळे यांची नागपूर शहर येथे बदली झाल्याने पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना गुरुवारी सायंकाळी निरोप देण्यात आला.
सर्वसामान्यांमध्ये असलेली पोलिसांची प्रतिमा उंचावून पोलीस आणि जनता हे मैत्रीचे नाते निर्माण करण्यासाठी प्रवीण काळे यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अन्यायग्रस्तांची कैफियत ऐकून दोन्ही बाजू समजून घेत न्याय देण्याचा प्रयत्न काळे यांच्या कारकिर्दीत झाल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी आणि प्रेमाची भावना निर्माण झाली होती. शिवाय कर्मचाऱ्यांशी उर्मट भाषेत न बोलता त्यांना समजून घेणे,त्यांना आलेल्या अडचणींवर मार्ग काढणे,दमदाटी किंवा बॉसिंग न करता मार्गदर्शन करणे यामुळे कर्मचाऱ्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून प्रवीण काळे यांना स्थान दिले होते.
यावेळी एपीआय सुनीता राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ठाणेदार प्रवीण काळे यांच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे सांगितले.पोलीस म्हटलं की बदली आलीच त्यामुळे आम्हाला बदली हा विषय नवीन नाही मात्र चांगले आणि मार्गदर्शक अधिकारी सोडून जातांना नक्कीच वेदना होतात अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. यावेळी पत्रकार मंगेश तायडे, दिनकर सुंदरकर, प्रा. मोरेश्वर इंगळे, पीएसआय सुनील खंडारे, रवी देशमुख,पो.कॉ.विनोद भगत, हे.कॉ.धैर्यशील कुर्हेकर,सचिन बहाडे,डॉ.चर्जन,सिद्धार्थ राऊत,संतोष गहरवार पोलीस कर्मचारी, अधिकारी, पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून प्रवीण काळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रवीण काळे यांचे खासगी वाहन फुलांनी सजवून फुलांची उधळण करत पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना भावपुर्ण निरोप दिला यावेळी आपल्या सहकाऱ्यांनी प्रेमाने दिलेला निरोप बघून प्रवीण काळे यांना सुद्धा अश्रू अनावर झाले होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे.कॉ.संजय देऊळकर यांनी केले.
यावेळी या निरोप समारंभाला पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, पत्रकार मंडळी तसेच पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!