गुरुकुंज येथील सर्व तीर्थ कुंडात कमलबाई हटवार यांच्या अस्थी विसर्जन
◆हटवार परिवाराचा समाजापुढे आदर्श
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
माजी जि.प. सदस्य नितीन हटवार यांच्या मातोश्री गं.भा. कमलबाई संभाजी हटवार (८६) यांचे २१ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर नांदगाव पेठ येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांच्या अस्थी गुरुकुंज मोझरी येथील सर्व तीर्थ कुंडात विसर्जित करण्यात आल्या. मोक्षप्राप्तीसाठी कोणतेही बडेजाव करणारे संस्कार न करता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी निर्माण केलेल्या सर्व तीर्थ कुंडात अस्थीविसर्जन करून संस्कार पार पडला.हटवार कुटुंबीयांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण करत नागरिकांनी अस्थी विसर्जन संस्कार सर्व तीर्थ कुंडात करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.
१६० वर्षीय योगी संत सीतारामदास बाबा यांच्या हस्ते या कुंडाचे पूजन करण्यात आले होते. तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज मध्ये या कुंडाचे निर्माण केले असून या कुंडात जवळ जवळ गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, शरयू, नर्मदा शिखरा ,वर्धा सह तब्बल ३५ नद्यांचे पाणी सोडण्यात आले आहे. अस्थीविसर्जन साठी मोठ्या नदीवर जाणे शक्य नसलेल्या लोकांसाठी तुकडोजी महाराजांनी हा कुंड निर्माण केला होता. दररोज शेकडो लोक अस्थीविसर्जनसाठी याठिकाणी येतात.
पहाटे पाच वाजता समाधी पूजन झाल्यानंतर ग्रामगीता,भगवदगीता वाचन करून कोणतीही दक्षणा न घेता अस्थी विसर्जन संस्कार याठिकाणी पार पाडण्यात येतो.उद्धवदादा वानखडे यांच्या मार्गदर्शनात हटवार कुटुंबातील २१ महिला पुरुष या संस्कारामध्ये सहभागी होऊन आपल्या आईच्या अस्थी येथेच विसर्जित करण्याचा संकल्प पूर्ण केला.या ठिकाणी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत दामोदर बाबा, संत अच्युत महाराज, संत बाळू महाराज, संत लहानुजी महाराज यांच्यासह अनेक संतांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या हे विशेष!
सर्व मानव जातीच्या उत्थानाकरिता गुरुकुंज आश्रमाच्या वतीने लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असून अस्थी विसर्जन हा संस्कार करण्याकरिता येथील सर्व तीर्थ कुंडाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळी नितीन हटवार यांनी केले.