स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय नांदगाव पेठ येथे ‘स्कूल कनेक्ट संपर्क अभियान’ अंतर्गत मार्गदर्शन वर्ग
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार वर्ग बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ बद्दल माहिती व्हावी या उद्देशाने अंतर्गत गुणवता हमी कक्ष आय.क्यू.ए.सी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि दतात्रय पुसदकर कला महाविद्यालयाच्या वतीने ‘स्कूल कनेक्ट’ एनईपी 2020 संपर्क अभियान मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक सत्र 2024- 25 पासून उच्च शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवलेले आहे. या पार्श्वभूमीवर वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांना याबाबत जनजागृती व्हावी हा प्रमुख उद्देश या संपर्क अभियान मार्गदर्शन वर्गाचा होता.
या मार्गदर्शन वर्गाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे आणि या विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती येथील वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. अरुण हरणे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद जुनियर कॉलेज नांदगाव पेठ येथील प्रा. उल्हास घारड आणि सरस्वती गोसावी आश्रम शाळा नांदगाव पेठ येथील प्रा. पिंपळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकेमध्ये प्राचार्य डॉक्टर विजय दरणे यांनी स्कूल कनेक्ट संपर्क अभियानाची रूपरेषा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणी बाबत माहिती दिली. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी आणि तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा.डॉ. अरुण हरणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची रूपरेषा व शिक्षण क्षेत्रात होऊ घातलेल्या आमुलाग्र बदल याविषयी चर्चा केली. पुढे बोलताना शैक्षणिक धोरण 2020 चे फायदे आणि विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या करियर संधी याविषयी भाष्य केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे विद्यार्थीभिमुख आहे आणि यातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला कशी चालना मिळेल हे स्पष्ट केले. पुढे त्यांनी चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम आणि अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आय.क्यू.ए.सी समन्वयक प्रा. डॉ. पंकज मोरे आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुभाष पवार यांनी केले. या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या मार्गदर्शन वर्गाला नांदगाव पेठ परिसरातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती गोसावी आश्रम शाळा, अंजुमन उर्दू हायस्कूल, कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच छत्रपाल भुयार उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणवाडा गोविंदपुर, संत मारुती महाराज उच्च माध्यमिक विद्यालय अडगाव येथील वर्ग बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पी आर जाधव, प्रा. राजेशब्राह्मणे, प्रा. डॉ. श्रीकांत माहुलकर, प्रा. डॉ. सुनिता बाळापुरे, प्रा. डॉ. गोविंद तिरमनवार, प्रा. डॉ. सुभाष पवार, प्रा. डॉ. विकास अडलोक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद ज्ञानेश्वर बारस्कर, रेखाताई पुसतकर, दिलीप पारवे, विनायक पावडे, राहुल पांडे आणि अनिल शेवतकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती.