चार दिवसांपासून बेपत्ता इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह
■नांदगाव पेठ मधील घटना
■मंगेश तायडे
■नांदगाव पेठ
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ईसमाचा सोमवारी सकाळी नांदगाव पेठ येथील बैस हॉटेलच्या मागे असलेल्या विहिरीत मृतदेह आढळला.विहिरीजवळ अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्यावरून नागरिकांना संशय आल्याने त्यांनी नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
चरणदास श्रीराम चापके (६०) असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. मात्र आत्महत्येमागील गूढ अद्याप गुलदस्त्यात आहे.
चरणदास चापके यांचे बस स्टॅन्ड वर चप्पल दुरुस्तीचे दुकान आहे. दररोज ते याठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. शुक्रवारी सायंकाळ पासून चरणदास चापके हे बेपत्ता होते.घरच्यांनी शोधाशोध केली मात्र त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. सोमवारी सकाळी आजूबाजूच्या नागरिकांना बैस हॉटेलच्या मागील परिसरात असलेल्या विहिरीजवळ कपडे व काही साहित्य पडलेले दिसले.त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून बघितले तर शव तरंगताना दिसले.घटनेमुळे नागरिकांना धक्का बसला व लगेच त्यांनी नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलीस उपनिरिक्षक लोकडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर तसेच कपड्यावरून चरणदास चापके यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या चमूला पाचारण करून मृतदेह बाहेर काढण्यात आला व उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. चरणदास चापके यांना एक मुलगा असून नेमके आत्महत्या मागील कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोउनि लोकडे करीत आहे.