spot_img

मॉर्निंग चषकाचे माध्यमातून नवोदित खेळाडूंना मोठी संधी-आमदार सौ.सुलभाताई खोडके

मॉर्निंग चषकाचे माध्यमातून नवोदित खेळाडूंना मोठी संधी-आमदार सौ.सुलभाताई खोडके

■मॉर्निंग चषक २०२३-२४ भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने

■अंतिम फेरीत सान्नि अकोला संघ ठरला प्रथम पारितोषिकाचा मानकरी

■शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षानिमित्त भव्य आयोजन

■मिररवृत्त
■अमरावती

दर्जेदार खेळासाठी आव्हाने कितीही असली तरी ती स्वीकारीत सर्वोत्कृष्ट नैसर्गिक खेळाचे प्रदर्शनाद्वारे सांघिक कामगिरीतून विजय मिळवून देणे आवश्यक असते.क्रिकेट या खेळात एकदा अपेक्षांचे ओझे आणि चांगली कामगिरी करण्याचे दडपण असले तरी अष्टपैलू कामगिरीतून विजयश्री साकारणे हे महत्त्वाचे आहे. याचा प्रत्यय या सामन्यात वेळोवेळी दिसून आला आहे. नवोदित खेळाडू आपली क्षमता सिद्ध करत असले तरीही त्यांना आपली उपयुक्तता दाखविण्यासाठी अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी ठरू पाहत आहे. कामगिरीत सातत्य राखण्यासाठी खेळाडूंनी फिटनेस व क्षेत्ररक्षणावर भर देणे गरजेचे आहे.क्रीडा स्पर्धेत यश मिळविणाऱ्या व सहभागी झालेल्या खेळाडूंचा अभिमान वाटतो. त्यांच्या कामगिरीने राज्याचा गौरव उंचावला आहे. भविष्यात या कामगिरीत निश्चितच प्रगती होईल. अशी आशा व्यक्त करीत या सामन्यांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंचे आपण अभिनंदन करतो. अंतिम सामन्यात विजेता व उपविजेता संघांनी आपल्या कामगिरीचा अमिट ठसा उमटविला आहे. नवोदित खेळाडूंसाठी मॉर्निंग चषक मध्ये सहभाग ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणाऱ्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन त्यांचा वारसा पुढे नेण्याची जवाबदारी युवा पिढीवर आहे.आव्हानात्मक परिस्थितीत मोठी खेळी करण्याचे लक्ष्य राखीत नेत्रदीपक कामगिरीसाठी सकारात्मकता बाळगणे सुद्धा आवश्यक असते, हे मात्र विसरून चालणार नाही. प्रत्येक सामन्यात खेळतांना मर्यादित षटकांतील कामगिरी सुधारण्यासह विजयी लय कायम राखण्यावर संघातील प्रत्येक सदस्यांनी भर देणे गरजेचे आहे.आव्हान अत्यंत कठीण असले,तरी अशक्य अजिबात नाही. हा ध्यास मनी बाळगून प्रत्येक खेळाडूंनी आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केल्यास विजयी लक्ष्य गाठणे सुलभ व शक्य होते. असे प्रतिपादन आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी मॉर्निंग चषक २०२३-२४ भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने बक्षीस वितरण समारंभात उपस्थितांना संबोधून केले. रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी व मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वा. मो.उपाख्य दादासाहेब काळमेघ व स्वर्गीय प्रशांत उर्फ गोटूभाऊ चांदूरकर स्मृती प्रित्यर्थ मॉर्निंग चषक २०२३-२४ भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य-हेमंतभाऊ काळमेघ, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय प्राचार्य डॉ स्मिता देशमुख, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक-प्रा. विलास ठाकरे,बालरोग तज्ञ-डॉ. भुपेश भोंड,मनोज चांदूरकर,डॉ. अक्षय ढेवले आदी उपस्थित होते. यावेळी संदीप उर्फ पिंटू देशमुख यांनी आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर अन्य अतिथी मान्यवरांचे सतीश उर्फ गुड्डू ढोरे,रवीभाऊ गणेशपुरे, प्रमोद बोरकर, मिलिंद पुंड यांनी यथोचित स्वागत केले.याप्रसंगी नर्मदा सायकल परिक्रमा बद्दल शशिकांत ठवळी यांचा आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ-स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अमरावती येथे पंचवटी चौक परिसर स्थित रूरल इन्स्टिट्यूट क्रीडांगण येथे ४ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान लीग पध्दतीने १० षटकांच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती, अकोला,वाशीम,बुलढाणा, यवतमाळ,अहमदनगर येथिल टीम सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेत एकूण २४ चमुंनी सहभाग होता. रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात अकोला येथील सान्नि टीमने बुलढाणा येथील ताज इंडियाच्या संघाला पराजित करून विजय संपादन करीत जेतेपद पटकाविले होते. याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल सान्नि-अकोला संघाला १ लक्ष रुपये पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. यासोबतच बुलढाणा येथील ताज इंडियाचा संघ उपविजेता ठरल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य-हेमंतभाऊ काळमेघ यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ५१ हजार रुपये व चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.यासोबतच मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सिरीज,सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजी चे मानकरी ठरलेल्या खेळाडूंना अतिथींचे हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-शिवा सावके यांनी तर प्रास्ताविक-प्रा. विलास ठाकरे यांनी केले.याप्रसंगी आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, क्रीडाप्रेमी,सहभागी संघाचे सदस्य,आमंत्रित सदस्य,संघ व्यवस्थापक,आदींसह बहुसंख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमांती सर्व उपस्थितांचे मिलिंद पुंड यांनी आभार मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!