…होय, मी अमरावती लोकसभा लढणार !
डॉ. बाबासाहेबांचे नातू आंनंदराज आंबेडकरांची घोषणा
■मिररवृत्त
■अमरावती
…मी समाज आग्रहास्तव अमरावती लोकसभेची निवडणूक लढविणार आहे, ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी (ता.३) अमरावतीत केली. रिपब्लिकन सेनेला इंडिया आघाडीत सामावून घ्यावे व इंडिया आघाडीतर्फे अमरावती लोकसभेची जागा रिपब्लिकन सेनेसाठी सोडावी यासाठी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्याशी बोलणी नियोजीत असल्याचेही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
सध्या देशातील राजकारण व सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही व फोडा-फोडीच्या कुरघोडी राजकारणामुळे विरोधातील राजकीय पक्षांची झालेली वाताहत बघता एकाही विरोधी पक्षात एकट्याने निवडणूक लढण्याची ताकद आता राहिलेली नाही. परिणामी देशात लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र लढल्यावाचून गत्यंतरही नाही. म्हणून रिपब्लिकन सेनेलाही इंडिया आघाडीत शामिल करून घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेनेला अमरावती लोकसभा हि एकच जागा मिळावी हि एकच आग्रही मागणी रिपब्लिकन सेनेची आहे. इंडिया आघाडीकडून रिपब्लिकन सेनेच्या भूमिकेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास मात्र स्वबळावर मैदानात उतरण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना जाहीर केले. यावेळी प्रा. विजय लुंगे, प्रा. सतीश सियाले, बाळासाहेब वाकोडे, अनिल बरडे, पी.एस.खडसे, एम.एम.चोखन्द्रे, ऍड. रौराळे आदी उपस्थित होते.
■ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी■
भारतातील लोकशाही शाबूत ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची हुकूमशाहीची राजवट उलथवून टाकणे गरजेचे झाले आहे. ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत घट्ट पाय रोवलेल्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी त्यांना ईव्हीएमचा गैरवापर करण्यापासून रोखावे लागेल. यासाठी रिपब्लिकन सेनेतर्फे माध्यमातून
ईव्हीएम हटाव-देश बचाव, ईव्हीएम हटाव-संविधान बचावचा नारा देण्यात आला आहे. यासाठी ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरु असल्याची माहितीही आनंदराज आंबेडकर यांनी दिली. देशातील नागरिकांना आता ईव्हीएमवर विस्वासच राहिला नसल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.
■नवे कायदे म्हणजे देशाला तुरुंग बनविण्याचा घाट■
भाजप नेतृत्वातील सरकारने विरोधकांना संपविण्याची खेळी सुरु आहे. हुकूमशाही पद्धतीने कारभार हाताळून व नव-नवीन कायदे बदल करून, विविध गुन्ह्यांच्या शीक्षेत भरमसाठ वाढ करून संपूर्ण देशवासियांना तुरुंगात टाकण्यासाठी देशाला तुरुंग बनविण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. हे असेच सुरु राहिले तर देशवासियांचे स्वातंत्र्य जास्त काळ टिकणार नाही. म्हणून प्रत्येक नागरिकांसह सर्वच राजकीय पक्षांनी या विरोधात एकत्र येणे हि काळाची गरज आहे. भारतात लोकशाही कायम टिकवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी आप-आपसातील हेवे-दावे, अहंकार बाजूला ठेऊन एकत्र यावे-लढावे हि जाहीर अपेक्षाही आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली.
■मतदानपूर्व १५ दिवसातील घटनाक्रमावरून ठरतो निकाल■
तुम्ही मुंबईचे स्थायिक, दादरच्या इंदुमीलची जागा डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाली यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न फळाला गेले, केवळ सत्तेच्या मागे न लागत आंबेडकरी समाजाशी प्रामाणिक अशी तुमची ओळख व मुंबईत प्रचंड जनाधार असतांना लोकसभा निवडणूक मुंबईतून न लढता अमरावतीतून लढण्याचा आग्रह का ? या प्रश्नाचे उत्तर देतांना आनंदराज आंबेडकर म्हणाले कि, अमरावतीचे रिपाई कार्यकर्ते व आंबेडकरी समाजाच्या आग्रहास्तव मी अमरावती लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. हि निवडणूक जिंकण्याचेही पक्के नियोजन सुरु आहे. तसेही प्रत्येक निवडणुकीचा निकाल हा त्या निवडणुकीच्या मतदानपूर्व १५ दिवसातील घडामोडी व घटनाक्रम यावरच त्या निवडणुकीचा निकाल ठरतो. या निवडणुकीत आमच्या बाजूने निकाल लागावा यासाठी आवश्यक त्या योजना करून विजयश्री मिळवून दाखवू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
■शरद पवार व अन्य नेत्यांच्या भेटी-गाठी घेणार■
रिपब्लिकन सेनेला इंडिया आघाडीत शामिल करून घेण्यासाठी शरद पवार व आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी-गाठी घेतल्या जातील. अद्याप निवडणुकीला बराच वेळ आहे, जागावाटपाचा फार्मुलाही नक्की झालेला नाही. आगामी काळात या सर्वच मुद्दांवर चर्चा होईल. जिंकून येणाऱ्या उमेदवारांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवायचे हा फार्मुला इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांना मान्य आहे, आणि आम्ही अमरावती लोकसभेची जागा जिंकू शकतो याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. हि वस्तुस्थिती इंडिया आघाडीतील घटक पक्षही नाकारणार नाहीत असा दावाही त्यांनी यावेळी केला