spot_img

समाजाला दिशादर्शक विषयांवर मंथन होणे आवश्यक -आ.यशोमती ठाकूर

समाजाला दिशादर्शक विषयांवर मंथन होणे आवश्यक
-आ.यशोमती ठाकूर

■स्व.माणिकराव घवळे वादविवाद स्पर्धेचे थाटात उद्घाटन

■मिररवृत्त
■अमरावती

आज समाजात वेगवेगळ्या विषयावरून मतभेद आहेत. चांगला विचार समाजात रुजविण्यासाठी आवश्यक अशा विषयावर कोणीही चर्चा करताना दिसून येत नाही. आरक्षणासारखा गंभीर विषय तरुण पिढीला अभ्यासपूर्वक मांडता यावा यासाठी या वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले विचारपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. समाजाला दिशादर्शक ठरतील अशा सामाजिक विषयांवर मंथन होणे काळाची गरज असल्याचे मत माजी मंत्री तथा आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय आणि स्व.माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त माध्यमाने आयोजित स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन आज आ.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, माजी कोषाध्यक्ष हरिहर ठाकरे, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्रफुल्ल घवळे आदी मान्यवरांची विचारपीठावर उपस्थिती होती.
स्वागतपर भाषणातून प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी स्पर्धा व महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बोलतांना हेमंत काळमेघ म्हणाले की अमरावती येथे विधी अभ्यासक्रम सुरू करताना ज्यावेळी नागपूर विद्यापीठाकडून प्रथमतः अभ्यासक्रम नाकारण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी संविधान सभेची बैठक सोडून भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी नागपूर विद्यापीठात शिवाजी महाविद्यालयात विधी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला होता. या युक्तिवादामुळेच संस्थेला केवळ एकाच वर्षात विधी आणि वाणिज्य या ज्ञानशाखा सुरू करता आल्या आहेत. चांगले युक्तिवाद होण्यासाठी चांगले विचार आणि अभ्यास आजच्या पिढीत रुजणे आवश्यक आहे. ते काम महाविद्यालय आणि स्पर्धेचे आयोजक उत्तमरीत्या करीत असल्याचे मत हेमंत काळमेघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून दिलीप इंगोले यांनी म्हटले की, गेल्या २२ वर्षांपासून सातत्याने वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून प्रफुल्ल घवळे व त्यांच्या आयोजन समितीमधील सदस्य निश्चितपणाने वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा घेऊन सामाजिक प्रबोधन करत आहेत. आणि यामधून अनेक वक्ते घडत असल्याचा अभिमान सुद्धा आहे. या स्पर्धेच्या मी गेल्या २२ वर्षांपासून साक्षीदार असून या प्रेरणादायी उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल घवळे यांनी केले तर संचालन रत्नाकर शिरसाठ व आभार मयूर चौधरी यांनी मानले.
आर्थिक निकषांवर आधारित राजकीय आरक्षण देशहिताचे आहे या विषयांवर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.उदघाटन समारंभाला विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!