देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे
■मिररवृत्त
■नवी दिल्ली
ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक संपली आहे. हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाहीय. ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात मोठा फटका सहन करावा लागला. या संपामुळे आज दिवसभर आणि काल संध्याकाळपासून अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांबाहेर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही पेट्रोल पंपमधील पेट्रोल आणि डिझेलचा
साठा संपला, त्यामुळे नागरिकांवर प्रचंड मनस्तापाची वेळ आली. या संपामुळे आज सकाळी भाजीपाला प्रचंड महागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक खूप अडचणीत सापडले होते. अखेर सरकार आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला.