भीमा कोरेगावचा इतिहास ७० देशात पोहचवणार-एम.एस. बहल
■सायन्सकोर येथे मानवंदना देण्यासाठी उसळला भीमसागर
■माजी सैनिकांनी दिली बुलेट वरून मानवंदना
■मिररवृत्त
■अमरावती
कोरेगाव ((भीमा) येथे पेशव्यांविरोधात झालेल्या संघर्षात पाचशे महार सैनिकांनी मिळविलेला ऐतिहासिक विजय हा आपल्या शक्तीचा आणि पराक्रमाचा विजय आहे. देशविदेशात आपले समाजबांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत आणि त्यांनाही त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास माहीत व्हावा यासाठी भीमा कोरेगावच्या पराक्रमाचा इतिहास इंग्लड सह सत्तर देशात पोहचवणार असा दृढ संकल्प इंग्लंड येथून आलेले भीम अनुयायी एम.एस. बहल यांनी सोमवारी सायन्सकोर मैदान येथे अयोजित मानवंदना कार्यक्रमाच्या धम्मपिठावरून बोलतांना केला.
गत बारा वर्षांपासून लॉर्ड बुद्ध त्रिवारवंदन संघ व भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना आयोजन समिती
यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदान याठिकाणी शौर्य दिवस साजरा करून भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देण्याचा कार्यक्रम हजारो अनुयायांच्या उपस्थितीत पार पडतो.द्विशतकीय भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृतीला मानवंदना देण्यासाठी सोमवारी सायंकाळी येथील सायंस्कोर मैदानात हजारोंच्या संख्येने निळा जनसागर उसळला होता. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देण्याचा कार्यक्रम पार पडला. बुध्द शरणं गच्छामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.
लॉर्ड बुद्ध त्रिवारवंदन संघ व भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मानवंदना आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ जानेवारी या कालावधीत स्थानिक सायंस्कोर मैदानात शौर्य दिनाचे अयोजन करण्यात आले आहे. द्विशतकीय मानवंदनेच्या तीन दिवसीय कार्यक्रमाला सोमवार पासून प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभ सामूहिक बुध्दवंदना झाल्यानंतर भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला समता सैनिक दल, माजी सैनिक, भीमसैनिक यांनी मानवंदना दिली. यावेळी धम्मपिठावर कमलताई गवई,डॉ.राजेंद्र गवई, अनिल भटकर,सुखचंद राम,गंगाधर राऊत,अरुण आठवले,मंदाकिनी बागडे,बी.आर.धाकडे,अनिल बागडे,शिवा प्रधान रामकृष्ण तायडे,राजेंद्र नितनवरे,वसंतराव गवई,व्ही.एम. वानखडे ,समाधान वानखडे,मनोहर तायडे,सिद्धार्थ शेंडे,संतोष केशरवानी,राजू राठी,संजय थोरात,सुभाष मोरे,राहुल मेश्राम आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
डॉ. राजेंद्र गवई यांनी या मानवंदना कार्यक्रमाच्या अयोजनाबद्दल कैलाश मोरे यांचे अभिनंदन करत त्यांचा सपत्नीक सत्कार केला. उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी बोलताना म्हटले की शक्ती आणि बुद्धीचा आपल्याला इतिहास आणि वर्तमान आहे त्यामुळे प्रत्येकाने या दोन्ही गोष्टींचा चांगल्या कार्यासाठी वापर करावा.यावेळी हजारोंच्या संख्येने निळा जनसमुदाय याठिकाणी जमला होता. मानवंदना कार्यक्रमानंतर सप्तखंजेरीवादक तुषार सुर्यवंशी, पवन दवंडे, अशोक निकाळजे व कुणाल वैराळे यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला.
■बेलोरा येथे कायमस्वरूपी ‘विजयस्तंभ’■
अमरावती येथे १२ वर्षांपासून विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम यशस्वीपणे अमरावतीला राबविण्यात येतो.त्या अनुषंगाने बेलोरा विमानतळ जवळ अडगाव खुर्द याठिकाणी धम्मशांती विपश्यना मेडिटेशन सेंटरची निर्मिती करण्यात येणार असून त्याठिकाणी कायमस्वरूपी विजयस्तंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजक कैलाश मोरे यांनी दिली.