spot_img

जिजाऊ बँकेला नवे वैभव प्राप्त करून देऊ ,‘परिवर्तन’चे अरविंद गावंडे यांचा विश्वास

जिजाऊ बँकेला नवे वैभव प्राप्त करून देऊ

■‘परिवर्तन’चे अरविंद गावंडे यांचा विश्वास
■सर्व जागांवर विजयी होण्याचा निर्धार

■मिररवृत्त
■अमरावती

जिजाऊ कमर्शिअल को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूकीत बँकेच्या विकासाचा अजेंडा पुढे ठेऊन आम्ही समोर आलो आहोत. बँकेत सुरू असलेला गैरभारामुळे प्रत्येक सभासदाच्या मनात असंतोष पसरला आहे. हा असंतोष कमी करून पुन्हा एकदा जिजाऊ बँकेला जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही १५ उमेदवार या निवडणूकीच्या रिंगणात परिवर्तन पॅनलच्या रूपाने उतरलो आहोत. सर्वच्या सर्व १५ जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी होतील असा निर्धार आम्ही केला असून येत्या नवीन वर्षात जिजाऊ बँक देखील आनंद साजरा करेल असा विश्वास परिवर्तन पॅनलचे प्रमुख अरविंद गावंडे यांनी व्यक्त केला आहे.
बँकेच्या कारभारात अनेक चांगले बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तन पॅनलने आपला अजेंडा मतदारांसमोर ठेवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एकही शाखा बँकेला उघडता आली नाही. परंतू येणाऱ्या ५ वर्षांत २५ शाखा उघडण्याचा आमचा संकल्प आहे. ज्यांनी बँकेला प्रगतीवरून अधोगतीचा रस्ता दाखवला त्यांच्या फंदात आता मतदार पडणार नाहीत अशी मला खात्री आहे. जिजाऊ बँक ही विदर्भाची शान असून या बँकेला जुने वैभव परत मिळवून द्यायचा आमचा दृढसंकल्प आहे. बँकेची ख्याती ही बहुजन समाजातील तरूणांना चांगले उद्योजक घडविण्यासाठीची आहे. बँकेने ते काम सक्षमपणे केले आहे. परंतू गेल्या काही वर्षात ज्यांच्यामुळे बँकेच्या मुळ उद्देश्यालाच ग्रहण लागले ते आता सर्वांच्या लक्षात आलेले आहे. अनेक चौकशीतून बँकेत निघालेला गैरकारभार हा सर्व सभासदांच्या जिव्हारी लागला असून सभासदांचा विश्वासघात करणाऱ्या मंडळींना पुन्हा आता सभासद जागा देणार नाहीत. त्यामुळे परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार सर्वच जागांवर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे असे मत परिवर्तन पॅनलचे प्रमुख अरविंद गावंडे यांनी व्यक्त केले आहे.

नव्या वर्षात साजरा करू विजयोत्सव
२०२४ हे वर्ष जिजाऊ बँकेच्या इतिहासात परिवर्तन घडविणारे नवे पर्व ठरणार आहे. अनेक वर्षांनंतर बँकेला एक चांगले संचालक मंडळ मिळणार आहे. आजवर जे चुकीचे झाले ते पुन्हा आम्ही होऊ देणार नाही. तसेच जेथे कमतरता असतील त्या देखील भरून काढू. भविष्यात बँकेच्या कारभारात चांगले बदल करून जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी आम्ही काम करू. एनपीए कमी करून नफा वाढविण्यावर भर देऊ. १ तारखेला मतमोजणीनंतर आम्हीच विजयाचा जल्लोष साजरा करू असा विश्वास गावंडे यांनी व्यक्त केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!