spot_img

युवापिढीने संस्कृती व संस्कार जपण्याची गरज ,खासदार नवनीत राणा यांचे प्रतिपादन

युवापिढीने संस्कृती व संस्कार जपण्याची गरज

■खासदार नवनीत राणा यांचे प्रतिपादन
■तेली समाज उपवर वधू परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळा

■मिररवृत्त
■अमरावती

आजच्या या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात युवा पिढीने समाज तसेच परिवारातील अडचणी समजून घेत संस्कृती व संस्कार जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले. शिक्षण हे संस्कार पेक्षा मोठे नाही ही बाब लक्षात ठेवून युवा पिढीने मार्गक्रमण केल्यास समाजासोबतच परिवार टिकेल आणि परिवार एकसंघ राहील असा मोलाचा सल्ला देखील दिला.अमरावती जिल्हा तैलिक समिती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खासदार नवनीत राणा बोलत होत्या.तेली समाजाचे मार्गदर्शक शंकरराव हिंगासपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार रामदास तडस ,खासदार डॉ. अनिल बोंडे ,माजी खासदार अनंत गुढे,अमरावती प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे तैलिक समितीचे अध्यक्ष दिनेश बिजवे, नितीन हटवार ,संजय तिरथकर,अनिता तीखिले ,अरुण गुल्हाने ,अविनाश यशवंते ,कैलास गिरोळकर, केशवराव गुल्हाने ,ज्ञानेश्वरराव शिरभाते, राजेश हजारे ,दीपक गिरोळकर ,सुरेश बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.संघटनेच्या माध्यमातून तेली समाजाला संघटित करण्याचे काम आम्ही करीत असून संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शासन स्तरावर जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय झाला तसेच सदुंबरे येथील संताजी महाराजांच्या स्मारकासाठी मोठा निधी मिळाला .या पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याची ग्वाही खासदार रामदास तडस यांनी याप्रसंगी दिली.
या प्रसंगी खासदार डॉ. बोंडे ,अनंत गुढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संजय हिंगासपुरे व तैलिक समितीच्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचे संचालन दिनेश बिजवे यांनी केले तर प्रा.केशव गुल्हाने यांनी आभार मानले. मेळाव्यास मोठ्या संख्येने तेली समाज बांधवांची उपस्थिती होती.

●गरजूंना शिलाई मशीन व सायकल वाटप●

समाजाचे आपण काही देणं लागतो या उदात्त भावनेतून जिल्हा तैलीक समिती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या वतीने तेली समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू 11 महिलांना शिलाई मशीनचे वाटप तसेच पाच विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

◆कुर्यात सदा मंगलम पुस्तिकेचे विमोचन◆

तेली समाजातील उपवर वधू यांचा परिचय असलेल्या कुर्यात सदा मंगलम या पुस्तिकेचे विमोचन मेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .या पुस्तिकेत 500 पेक्षा अधिक मुला मुलींची माहिती आहे .याप्रसंगी मंचावरून 100 पेक्षा जास्त मुला-मुलींनी आपला परिचय दिला. यावेळी उपवर वधू तसेच त्यांचे पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!