शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात:
■विद्यार्थ्यांच्या डोळ्यांपुढे त्यांचे लाडके शिक्षक ठार,
■कोकणातून परतताना माळशिरसमध्ये घडला अनर्थ
■मिररवृत्त
■माळशिरस
शैक्षणिक सहलीवरून घराच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना गुरुवारी पहाटे माळशिरस तालुक्यात घडली. या घटनेत विद्यार्थ्यांच्या एका लाडक्या शिक्षकाचा त्यांच्या डोळ्यापुढेच मृत्यू झाला. यामुळे धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला होता.
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शन करून परतीचा प्रवास करत होती. ही बस गुरुवारी पहाटे 6 च्या सुमारास माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे रस्त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या एका टेम्पोला धडकली. त्यात शिक्षक बाळकृष्ण काळे (50) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिक्षक रमाकांत शिरसाट व अन्य काही विद्यार्थी जबर जखमी झाले. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शिक्षक बाळकृष्ण काळे हे बस चालकाच्या शेजारील शीटवर बसले होते.
■पंक्चर झाला होता टेम्पो■
माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे एक टेम्पो पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या शेजारी उभा होता. या ठिकाणी एक वळण होते. या वळणामुळे बस चालकाला रस्त्याशेजारी असणारा टेम्पो दिसला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची बस (एमएच 14 बीटी 4701 ) त्याच्यावर जावून आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात पुढे बसलेले शिक्षक काळे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी जिवाच्या आकांताने एकच रडारड सुरू केली.त्यानंतर पोलिस व स्थानिकांच्या मदतीने जखमी शिक्षक व विद्यार्थ्यांना अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. अपघातग्रस्त बस 19 डिसेंबर रोजी 4 शिक्षक व 40 विद्यार्थ्यांसह गणपती पुळे येथे गेली होती.