spot_img

गर्भपिशवी काढल्यानंरही झाली पुत्रप्राप्ती ! पं.मिश्रा यांनी केला भक्तीच्या शक्तीपुढे विज्ञानही झुकल्याचा दावा

गर्भपिशवी काढल्यानंरही झाली पुत्रप्राप्ती !

■पं.मिश्रा यांनी केला भक्तीच्या शक्तीपुढे विज्ञानही झुकल्याचा दावा

■मिररवृत्त
■हानुमानगढी,अमरावती

अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात येणाऱ्या तेल्हारा निवासी अर्चना अशोक श्रीवास हिच्या भक्तीच्या शक्तीपुढे विज्ञानही फिके पडले. या महिलेच्या गर्भाशयातील गाठीवर जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान तिची गर्भपिशवी काढावी लागली. परंतु तिचा देवाधिदेव महादेवांवरिल पक्का विश्वास आणि तिची शिवभक्ती याचे फळ तिला पुत्रप्राप्तीच्या रूपात मिळाल्याचा दावा शिवपुराण कथावाचक पं.प्रदीप मिश्रा यांनी केला. या कथेला उसळलेल्या लाखों शिवभक्तांपुढे सदर मिश्रा परिवारास त्यांच्या चिमुकल्यासह सर्वांपुढे दाखविण्यात आले. शिवपिंडीवर ‘एक लोटा जल’ अर्पित केल्याने काय होते असे विचारणाऱ्यांनी आजवर जितक्या शिवभक्तांनी भगवान शिव यांच्या भक्तीचा शक्तीचा अनुभव घेतला आहे त्यांच्याकडून पुरावे मिळवावे. विनाकारण सनातन धर्माविरुद्ध बोलू नये, हिंदूंनीही सनातन धर्माप्रती जागरूक राहावे असा जाहीर सल्लाही पं. मिश्रा यांनी दिला.
श्री हनुमान गढी ट्रस्टतर्फे आयोजीत पं. मिश्रा यांच्या ५ दिवशीय अंबा-अंबेश्वर शिवपुराण कथेचे बुधवारी (ता. २०) समापन झाले. कथेच्या समारोपीय दिनी पं. मिश्रा यांनी सांगितले कि पूर्वी गावात फक्त एकच डॉक्टर असायचा. तसेच एकच मंदिर असायचे ते भगवान शंकरांचे. पूर्वी गावातील एकच डॉक्टर गावातील प्रत्येकाच्या प्रत्येक रोगाचा उपचार करायचा. परंतु आज तर सर्वत्र निरनिराळ्या डॉक्टरांची फॅशन आली आहे. आज प्रत्येक आजार-रोगासाठी वेगवेगळा डॉक्टर शोधावा लागतो. आधी प्रत्येक गाव-शहरात सर्वत्र फक्त देवाधिदेव महादेव यांचेच मंदिर होते याचे कारण कि, भगवान शिव हेच असे एकमात्र डॉक्टर आहेत जे सर्व भक्तांच्या सर्व प्रकारच्या दुःखांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. त्यासाठी शिवपिंडीवर दूध-दही-तूप आदी वाहण्याची काही गरज नाही केवळ ‘एक लोटा जल’ हाच साऱ्या दुःखांवरील साधक-सार्थक उपाय आहे. जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट येथील सुषमा खंडेलवाल यांच्या मुलाचा चर्मरोग, वडगावच्या पलक जोशी यांना झालेली पुत्रप्राप्ती, चांदुर बाजारच्या युवकाचा दूर झालेल्या सोरायसीस असे शेकडो भक्त शिवभक्तीच्या शक्तीचे साक्षात प्रमाण म्हणून समाजात आहेत. जो व्यक्ती मृत्युशय्येवरून उठून उभा झाला आहे त्याच्याही घरी शिवभक्तीच्या शक्तीचे प्रमाण घ्यायला नक्की जा असा सल्लाही त्यांनी शिव पिंडीवर जल व बेलपत्र अर्पित केल्याने काय होते असा सवाल करणार्यांना दिला.

बुधवारी या कथेच्या शेवटच्या दिवशी आम्ही जातो आमच्या गावा,आमचा तुम्ही राम राम घ्यावा म्हणत लाखों भाविकांनी हनुमान गढीला भावपूर्ण निरोप दिला.साश्रू नयनांनी भारावलेल्या अवस्थेत लाखो भाविक 5 दिवस शिवमहापुराणच्या भक्तिरसात न्हाऊन नवी ऊर्जा व नवी दिशा घेवून व आयोजकांचे आभार मानत भक्ती शक्ती ची शिदोरी घेवून जड पावलांनी आपापल्या गावी रवाना झाले. कथेच्या अंतिम दिवशी गर्दीने उच्चांक गाठला होता. शिवपुराण कथेच्या शेवटच्या दिवशी प्रदीप मिश्रा यांनी धर्म कर्म यांची सांगड घालीत प्रारब्ध आणि दैवी शक्ती याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या धर्माचा ज्वाजल अभिमान बाळगून प्रत्येकाने हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी कटिबध्द असावे असे आवाहनही त्यांनी केले. लाखो भाविकांच्या अलोट शिवकुंभाच्या उपस्थितीत श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जनार्दन बोथे गुरुजी, देवनाथ पिठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी सैनिक,पत्रकार,युवा स्वाभिमानचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांचे हस्ते महाआरती करून या ५ दिवशीय अंबा-अंबेश्वर शिवमहापुराण कथेचा समारोप झाला.

■कुत्रिम जटाधारी संतांपासून सावध रहा■

भगवान शिव शंकर यांची जटा मोकळ्या करण्याचा हट्ट माता पार्वतीने धरला होता. परंतु शेकडो वर्ष प्रयत्न करूनही महादेवांच्या जटेची एकही बट मोकळी होऊ शकली नाही. त्यामुळे हट्ट कोणता करायचा आणि किती करायचा याचे भाव प्रत्येकाने ठेवावे. महिलांनी आपल्या पतीकडून काय मागावे याचे भान ठेऊन अपेक्षा ठेवाव्या म्हणजे गृहकलह वाढणार नाही. तसेच समाजात वावरणाऱ्या कुत्रिम (बाजारात उपलब्ध असलेल्या कुत्रिम जट) जटाधारी संतांपासून सावध राहण्याची गरज आहे. अश्या कुत्रिम जटाधारी कथीत संतांमुळेच आमच्या संतांची महिमा मंडित होत आहे. त्यामुळे सनातन धर्माचा धर्मध्वज खाली येणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेण्याचे आवाहन त्यांनी कथामंचावरून केले.

■’त्याच’ जागेवर उभारणार भव्य शिव मंदिर■

श्री हनुमान गढी येथे पं. मिश्रा यांनी ज्या ठिकाणी आसनस्थ होऊन शिवमहापुराण कथावाचन केले त्याच ठिकाणी भव्य शिव मंदिर बांधण्यात येईल,अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली. शेकडो महिलांना इंदौरच्या सिहोर येथील कुबेरेश्वराच्या दर्शनाला गेलेल्या महिलांनी शीव नगरीतून आणलेल्या मातीने येथील शिव मंदिराची पायाभरणी करू असे राणा यांनी जाहीर करताच उपस्थित भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुढील वर्षी याही पेक्षा भव्य दिव्य असे शिवमहापुराण आपण आयोजित करू यासाठी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आम्हाला वेळ द्यावा अशी विनंतीही त्यांनी पंडित मिश्रा यांना केली.
यावेळी खासदार नवनीत राणा यांनीही रवी राणा माझ्या खासदारकी व आमदारकीच्या एक वर्षाच्या पगारातून शक्य तेवढ्या जास्त महिलांना श्री कुबेरेश्र्वर धाम सिहोर येथे नेण्या-आणण्याचा खर्च करण्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित लाखो महिलांनी श्री शिवाय नमस्त्भ्यु व हर हर महादेव चा जयघोष करीत जल्लोष केला.

■दुर-दुरुन आले भाविक, घरो-घरी पाहुणे■

या शिवमहापुराण कथेला भक्ताचा प्रचंड प्रतिसाद लाभला. विदर्भासह दूर-दुरून भाविक या कथेचा लाभ घेण्यासाठी अमरावतीत दाखल झाले होते. या निमित्ताने शहरातील अनेक परिवाराच्या घरी पाहुण्यांचे आगमन झाले. भाविकांच्या गर्दीने शहर गजबजून गेले. प्रत्येकजण या आयोजनाची चर्चा करतांना दिसला. या आयोजनामुळे अमरावतीत ऐतिहासिक शिवकुंभ अवतरित झाल्याचा दाखला विविध मान्यवरांसह खुद्द कथावाचक पं.मिश्रा यांनीही दिला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!