spot_img

विदर्भाचा उत्सव; बहिरम यात्रेला बुधवार पासून प्रारंभ

विदर्भाचा उत्सव;बहिरम यात्रेला बुधवार पासून प्रारंभ

■मिररवृत्त

■अमरावती

जवळपास दीड महिना चालणाऱ्या बहिरम येथील यात्रेला बुधवारपासून (दि. २०) सुरूवात होणार आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी भरणारी ही यात्रा ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी विदर्भासह संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील भाविक येथे येतात. ही यात्रा म्हणजे खवय्यांसाठी मेजवानी असते. हंडी मटन व मांडे हे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.
यात्रेमध्ये दोन्ही राज्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव कुलदेवतेला नवस फेडण्याकरिता येत असतात. पूर्वी घुंगराचा आवाज म्हणजेच तमाशा ही या यात्रेची ओळख होती. परंतु आ. बच्चू कडू यांच्या पुढाकाराने ही यात्रा तमाशामुक्त करण्यात आली. त्याऐवजी शंकरपटासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची येथे रेलचेल असते. आज या यात्रेला यात्रा महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यात्रेत मोठी रेलचेल असते. आबालवृद्ध यात्रेला हजेरी लावतात.

●गुलाबी थंडीत हंडी, रोडग्यांची मैफल●

ऐन हिवाळ्यात ही यात्रा भरत असली, तरी भाविकांसह यात्रेकरूंची मोठी गर्दी यात्रेच्या काळात पहायला मिळते. गुलाबी थंडीत या यात्रेत हंडी मटन, रोडगे व मांड्यांचा आस्वाद घेण्यासाठी दुरदुरून खवय्ये हजेरी लावत असतात.

●सर्व प्रकारच्यासाहित्याची दुकाने●

यात्रा म्हटली की, विविध दुकाने सजू लागतात. जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या यात्रेत मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील दुकानदार दुकाने थाटतात. त्यामध्ये खेळण्यांपासून संसारोपयोगी साहित्याची रेलचेल असते. लाकडी, लोखंडी, अॅल्युमिनियमसह मातीची विविध प्रकारची भांडी, नवनवीन शेती साहित्य व अवजारे तसेच शेतीउपयोगी साहित्य विक्रीसाठी येतात.

●बहिरम यात्रेतील जागांचा लिलाव; ५.१७ लाख जमा●

बहिरम यात्रेची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या येणाऱ्या व्यावसायिकांसाठी ११ डिसेंबरपासून जागांचा लिलाव सुरू झाला असून आतापर्यंत ५.१७ लाखांचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. यात्रेत कुठल्याच प्रकारचा घोळ होऊ नये व यात्रेचे नियोजन योग्य व्हावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून योग्य ते प्रारूप तयार करण्यात आले आहे. रस्ते, नाल्या, कच्च्या रस्त्याची व्यवस्था करणे, ६७३ भूखंडाचे नियोजन करण्यात आले असून लिलावानंतर उर्वरीत प्लॉटचे खुल्या पध्दतीने हर्रास केल्या जाणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!