अमरावती मधील व्हीएमव्ही परिसरातील बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनमंत्र्यांनी दिले आदेश
■आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या विधान भवनातील लक्षवेधीची तत्काळ दखल
■मिररवृत्त
■नागपूर
अमरावती शहरीभागातील व्हीएमव्ही कॉलेज परिसरात मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत व भीती निर्माण झाली आहे. या बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याचा मुद्दा अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात नुकताच उपस्थित केला दरम्यान या संदर्भात राज्याचे वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले . यांची तत्कळ दखल घेत अमरावती व्हीएमव्ही भागातील बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला निर्देशित केले आहे.
अमरावती शहरी भागातील व्हीएमव्ही परिसरात मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार असून रहिवाशी भागातही बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या संदर्भात आ.सौ . सुलभाताई खोडके यांनी मागील ८ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक भागात वन कर्मचाऱ्यां समवेत भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्याची सूचना केली . यावेळी बिबट्याचा शोध न लागण्याने नंतर दहा दिवसांनी पुन्हा मणिपूर लेआऊट भागात बिबट्याने उपद्रव घातला असल्याने एकच खळबळ उडाली असता आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी डीएफओ मिश्रा यांच्याशी संपर्क साधून बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक तैनात करून प्रभावी व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देखील केली .
दोन महिन्यापासून बिबट्या पकडण्याबाबत वन विभागाने प्रभावी कार्यवाही केली नसल्याने तो बिबट्या व्हीएमव्ही परिसरातच तळ ठोकून असल्याने स्थानिक विद्यार्थी , नागरिक व महिला यांचे घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. रात्रीला बिबट्या व्हीएमव्ही परिसरात संचार करत असल्याने यापासून जीवितहानी उद्भभवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात लावून धरत बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वन विभागाला आदेशित करण्याची मागणी केली .
तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन अमरावती मधील बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी अमरावती वन विभागाला आदेश देण्यात यावे , सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून ट्रँग्युलायझर च्या साहाय्याने बिबट्याला अटकाव घालण्याची विनंतीपूर्वक मागणी केली, यावर नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित आदेश काढण्या संदर्भात निर्देशित केले असता अमरावती वन विभाग उपवनसंरक्षक कार्यालयाने याबाबत कार्यवाहीला घेऊन हालचाली सुरु केल्या आहेत .