पोलीस पाटीलांच्या मागण्यांबाबत १५ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटनेचा महामोर्चा
●मिररवृत्त
●अमरावती
राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दि.१५ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटनेचा महामोर्चा चाचा नेहरू बालोद्यान शुक्रवारी तलाव येथुन निघणार आहे.
राज्याचे अध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील, राज्य कार्यकारी अध्यक्ष तथा अध्यक्ष अमरावती जिल्हा राहुल उके पाटील, राज्य कार्याध्यक्ष रुपेश सावरकर पाटील, विदर्भ अध्यक्ष नंदू हिवसे पाटील, राज्य समन्वयक कारभारी निंघोटे पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष अमोल ठाकरे पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील, वर्धा जिल्हाध्यक्ष सागर खोंडे पाटील, कार्याध्यक्ष मनोज हिवरकर पाटील, जालणा जिल्हाध्यक्ष अर्जुन ढगे पाटील, वाशीम जिल्हाध्यक्ष मंगेश सरनाईक तथा सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे .
राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली परंतु मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे राज्य कार्यकारी अध्यक्ष राहुल उके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटनेची मुंबई येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन पोलीस पाटील यांच्या महामोर्चाचे आयोजन दि.१५ डिसेंबरला केले आहे.
पोलीस पाटील यांना रुपये पंचवीस हजार मानधन देण्यात यावे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील अधिनियम १९६७ दुरूस्ती करून तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी, थकीत प्रवास भत्ता मिळण्यात यावा आणि मानधनासोबत तो मिळावा, नुतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, वयोमर्यादा ६५ वर्षे करण्यात यावी, वर्षाला दोन उपविभागीय कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण द्यावे, कर्तव्यावर मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटील पाल्यांना पदावर घेण्यात यावे, रिक्त पदे भरण्यात यावी,दर महिन्याला मानधन मिळावे, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस पाटील भवन निर्माण करावे, कर्तव्यावर आजारी पडल्यास वैद्यकीय सुविधा, सेवानिवृत्ती आर्थिक सहाय्य यासह इतर मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटनेचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलीस पाटील या मोर्चात सहभागी होणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पोलीस पाटील यांच्या मागण्यांबाबत पाठिंबा दर्शविला आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात बैठका घेऊन मोर्चात सहभागी होण्यासाठी पोलीस पाटील यांना आवाहन करीत आहे, अशी माहिती राज्यातील पोलीस पाटील यांचं नेतृत्व राहुल उके पाटील यांनी दिली आहे.
‘राज्यातील पोलीस पाटीलांच्या न्याय हक्काचा लढा असुन पोलीस पाटील यांच्या हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना पोलीस पाटीलांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व पोलीस पाटीलांच्या उपस्थितीत महामोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधनणार आहे’
●राहुल उके पाटील●
राज्य कार्यकारी अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना