गुजरातमध्ये बनावट ‘टोल’नाका;
●रोज हजारोंची वसूली, दीड वर्ष कुणाला कळलंच नाही
●मिररवृत्त
●गुजरात
गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गेल्या दीड वर्षापासून बनावट टोल नाका चालू असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्गाला बायपास करून खाजगी जमिनीवर हा बनावट टोल प्लाझा उभारल्याचे समोर आले. मोरबी जिल्ह्यातील बामनबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर हा टोल प्लाझा उभारून दीड वर्ष अवैध पैसे गोळा केला.
यापूर्वी गुजरातमध्येही बनावट सरकारी कार्यालये उघडण्याचे प्रकार उघडकीस आले होते. आता या बनावट टोल प्लाझा प्रकरणामुळे गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांनी त्यांच्या खाजगी जमिनीवर हायवेला बायपास करून बामनबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर बनावट टोल प्लाझा बांधला आणि एक वर्षाहून अधिक काळ अवैध टोल वसूल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकृत टोलनाक्याच्या व्यवस्थापकांनी दिलेली माहिती अशी, खासगी जमीन मालक दीड वर्षांपासून दररोज हजारो रुपये गोळा करत होता. आरोपी हे वाहतूक प्रत्यक्ष मार्गावरून व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीची जमीन, बंद कारखाना, वाढसिया गावाकडे जाणाऱ्या मार्गावर वळवत होते.
अमरीश पटेल नावाच्या व्यक्तीने राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला त्यांच्या बंद सिरॅमिक कारखान्याच्या सीमा भिंतीला दोन गेट बसवले होते. आरोपी व्यक्ती वाहने थांबवून त्यांना राष्ट्रीय महामार्गावर अधिकृत ऑपरेटरद्वारे चालवलेल्या टोल प्लाझाऐवजी त्यांनी तयार केलेला तात्पुरता टोल प्लाझा वापरण्यास भाग पाडत होते. येथे त्यांच्याकडून टोलच्या तुलनेत निम्मी रक्कम आकारण्यात येत होती.
अहवालानुसार अमरशी पटेल, रविराज सिंग झाला, हरविजय सिंग झाला, धर्मेंद्र सिंग झाला, युवराज सिंग झाला आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी वाघसिया, वांकानेर येथील रहिवासी आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चार जण सरकारी टोल प्लाझावर काम करत होते. आरोपी ट्रकचालकांकडून २० ते २०० रुपये घेत होते. तर या वाहनांसाठी प्रत्यक्ष टोल टॅक्स ११० ते ५९५ रुपये आहे. हे ‘बनावट टोल प्लाझा’ दोन स्थानिक रहिवाशांनी आणि इतरांनी गावातील दोन रेल्वे क्रॉसिंगचा वापर करून उभारले होते.
मोरबीचे जिल्हाधिकारी जीटी पंड्या यांनी दिलेली माहिती अशी, आम्हाला माहिती मिळाली की काही वाहने वघासिया टोल प्लाझाच्या वास्तविक मार्गावरून वळवली जात आहेत आणि टोल टॅक्स वसूल केला जात आहे. पोलीस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि सविस्तर तक्रार नोंदवली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू आहे.