spot_img

भारतीय संविधानाची तत्वप्रणाली हिच खरी स्वतंत्रता – अॅड. फिरदोस मिर्झा

भारतीय संविधानाची तत्वप्रणाली हिच खरी स्वतंत्रता – अॅड. फिरदोस मिर्झा

●विद्यापीठात संविधान दिनानिमित्त व्याख्यान संपन्न

●मिररवृत्त
●अमरावती
भारतीय संविधानातील कलम 16 अन्वये समानता, संधी असे अधिकार नागरिकांना मिळाले आहेत.भारतीय संविधानाची तत्वप्रणाली ख-या अर्थाने हीच स्वतंत्रता आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिध्द व्याख्याते व विधिज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने दि. 02 डिसेंबर रोजी संविधान दिनानिमित्त विद्यापीठ परिसरातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह येथे ‘भारतीय संविधानाची तत्वप्रणाली’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांची उपस्थिती होती.
अॅड. फिरदोस मिर्झा पुढे म्हणाले, संविधानाची तत्वप्रणाली समजून घेणे आवश्यक आहे. संविधानाची प्रस्तावना तत्वप्रणालीचाच सार आहे. तत्वप्रणालीचा पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकशाही आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता या पाच तत्वावर भारतीय संविधानाची रचना करण्यात आली आहे व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकार संविधानाने दिले आहेत. विचार, संभाषणाचे स्वातंत्र्य देशाचे संविधान आपल्याला देते. त्यामुळे भारतीय संविधानाचे ड्राफ्टींग अर्थात तत्वप्रणाली हीच स्वतंत्रता आहे, तर समता हा संविधानाचा आत्मा आहे, असे सांगून समाजातील शेवटचा घटक जर सुसंपन्न असेल, तर तत्वप्रणालीचा सदुपयोग योग्यरित्या होत आहे असे समजावे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधानाची तत्वप्रणाली समजून घेणे आवश्यक असल्याचे अॅड. मिर्झा म्हणाले.
प्रमुख अतिथी डॉ. प्रवीण रघुवंशी म्हणाले, जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आपल्या देशाला लाभले आहे. त्यामुळेच भारतीय लोकशाही ही समृध्द आहे असे सांगून त्यांनी भारतीय संविधानाची तत्वप्रणाली या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानाबद्दल डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणातून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह असे नामकरण झाल्यानंतर भारतीय संविधानावर प्रथमच व्याख्यान होत आहे. व्याख्यानाला असलेली प्रचंड गर्दी पाहता व्याख्यान व व्याख्यात्यांचा परिचय होतो. अॅड. फिरदौस मिर्झा यांनी विषयाची अगदी सुंदररित्या मांडणी केलेली आहे. व्याख्यानातून संविधानकत्र्यांचा भारतीय समाजाप्रती असलेला दृष्टिकोन आणि समाजाचा असलेला प्रचंड अभ्यासही दिसून येतो, असे सांगून भारतीय संविधान हे सर्वसमावेशक असेच आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी व्याख्याते अॅड. फिरदोस मिर्झा यांचा व तपोवन संस्थेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मेणबत्ती प्रज्वलीत करुन आणि संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देवलाल आठवले यांनी, तर आभार डॉ. कुसुमेंद्र सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाला माजी आमदार बी.टी. देशमुख, अमरावती महानगरपालिकेचे माजी महापौर मिलिंद चिमोटे तसेच विद्यापीठ अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, माजी अधिकारी, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!